लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील रुग्णवाल गार्ड माय सिटी ते डोंबिवली रेल्वे स्थानक आणि रुणवाल गार्डन ते वाशी नवी मुंबई अशा बस फेऱ्या कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या सहकार्याने सुरू करण्यात आल्या आहेत. रुणवाल गार्डनमधील रहिवासी, ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीवरून या बस सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळच्या गर्दीच्या वेळेत दोन फेऱ्या, संध्याकाळी दोन फेऱ्या असे या बसफेऱ्यांचे नियोजन आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकापासून ते रुणवाल गार्डन स्वतंत्र बसची सुविधा नसल्याने या गृहसंकुलातून प्रवास करणाऱ्या नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, वृध्द, शाळकरी विद्यार्थी यांना रिक्षा सेवेवर अवलंबून राहावे लागत होते. डोंबिवली रेल्वे स्थानकापासून रुणवाल गार्डन गृहसंकुलात येण्यासाठी रिक्षा चालक सहजासहजी तयार होत नव्हते. त्यामुळे प्रवाशांची दररोज कुचंबणा होत होती. तसेच, रुणवाल गार्डन गृहसंकुलातून अनेक रहिवासी नवी मुंबईत नोकरी व्यवसायासाठी जातात. त्यांना केडीएमटी, नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसवर अवलंबून राहावे लागत होते. नवी मुंबईत जाणाऱ्या या बस कल्याण, डोंबिवली शहरातूनच प्रवाशांची खचाखच भरून येत होत्या. रुणवाल गार्डनमधील नोकरदारांना या बसना लोंबकळत प्रवास करावा लागत होता.

रुणवाल गार्डनमधून प्रवास करताना होणाऱ्या त्रासाची माहिती रहिवासी, ज्येष्ठ नागरिकांनी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांना दिली होती. आमदार मोरे यांनी ही माहिती कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दिली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी याविषयी पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्याशी चर्चा करून रुणवाल गार्डनमधील रहिवाशांची कैफियत त्यांना सांगितली. आयुक्त डॉक्टर जाखड यांनी रुणवाल गार्डनमधील रहिवाशांच्या सोयीसाठी डोंबिवली रेल्वे स्थानक ते वाशी बस फेऱ्या सुरू करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बस उपलब्ध करून देण्याचे आश्वास दिले. रुणवाल गार्डनमध्ये सुमारे तीन हजार कुटुंब वास्तव्यास आहेत. या संकुलात सुमारे साडे सहा हजार लोक वस्ती आहे.

आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे रुणवाल गार्डन ते डोंबिवली रेल्वे स्थानक, रुणवाल गार्डन ते वाशी बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. आमदार राजेश मोरे, शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी महेश पाटील, दत्ता वझे, रुणवाल गार्डनमधील रहिवासी यांच्या उपस्थितीत शनिवारी या बस फेऱ्यांचे उद्घाटन करण्यात आले.

रुणवाल गार्डनमधील सुमारे साडे सहा हजार लोकांची स्वतंत्र बससेवेची मागणी होती. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने ही बससेवा रुणवाल गार्डनमधील रहिवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांचा या बसना चांगला प्रतिसाद मिळाला तर या फेऱ्या वाढविण्यात येतील. -राजेश मोरे, आमदार, कल्याण ग्रामीण.