कल्याण – कल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात गेल्या फेब्रुवारीमध्ये गोळीबार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या गोळीबार प्रकरणात आमदार गायकवाड यांचे व्यावसायिक भागीदार दिव्येश उर्फ विकी गणात्रा यांना पोलिसांनी अटक केली होती. आठ महिन्यांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या आधारे विकी गणात्रा यांचा जामीन मंजूर केला.

विकी गणात्रा हे विकासक आणि व्यावसायिक आहेत. त्यांचे मोबाईल विक्रीचे दुकान कल्याणमध्ये आहे. गणात्रा हे आमदार गणपत गायकवाड यांचे बांधकाम व्यवसायातील भागीदार आहेत. गेल्या फेब्रुवारीमध्ये कल्याण पूर्वेत आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात व्दारली भागातील एका जमिनीवरून वाद सुरू होता. त्यावेळी हा वाद समझोत्याने मिटविण्यासाठी आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे समर्थक, शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचे समर्थक हिललाईन पोलीस ठाण्यात समझोत्याच्या बैठकीसाठी एकत्र आले होते. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही गटात जोरदार बाचाबाची, धक्काबुक्की झाली होती.

हेही वाचा – पंतप्रधानांच्या सभेपूर्वी घोडबंदर विद्रुप, मोदी हेलेकाॅप्टरने येणार तरीही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांची घोडबंदरभर फलकबाजी

पोलीस ठाण्याबाहेर हा प्रकार सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात आमदार गायकवाड, व्यावसायिक विकी गणात्रा, शहरप्रमुख महेश गायकवाड, समर्थक राहुल पाटील बसले होते. बाहेर गदारोळ सुरू असताना महेश गायकवाड यांना काही कळण्याच्या आत आमदार गायकवाड यांनी जवळील रिव्हॉल्व्हरमधून सहा गोळ्या महेश यांच्या दिशेने झाडून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या गोळीबारातून सुटका करण्यासाठी राहुल पाटील दालनाच्या बाहेर पळत असताना त्यांनाही गोळी लागल्याने ते जखमी झाले होते.

हेही वाचा – मोदी यांच्या सभेमुळे प्रवाशांचे हाल; टीएमटीच्या बसगाड्या सभेसाठी वळविल्या, सॅटील पुलावर प्रवाशांच्या रांगा

या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांचा साथीदार विकी गणात्रा आणि इतर तीन जणांना अटक केली होती. आमदार गणपत यांचा मुलगा वैभव यांचेही नाव दाखल गुन्ह्यात आहे. पण तो फरार आहे. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत विकी गणात्रा यांच्याकडून जामीन मिळण्यासाठी न्यायालयात प्रयत्न सुरू होते. कल्याण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळल्याने ते वकिलामार्फत उच्च न्यायालयात जामिनासाठी प्रयत्नशील होते. गोळीबारात गणात्रा यांचा कोणताही सहभाग नाही. गोळीबार होण्यापूर्वी गणात्रा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या दालनातून बाहेर पडले होते, हा संदर्भ गणात्रा यांच्यावतीने न्यायालयाला देण्यात आला. हा पुरावा ग्राह्य धरत न्यालयाने विकी गणात्रा यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार गणपत गायकवाड हे तळोजा येथील तुरुंगात आहेत.