डोंबिवली– कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील डायरघर गावात कोयना प्रकल्पग्रस्त म्हणून शासनाकडून जमीन मिळालेल्या एका महिलेची २० गुंठे जमीन दिवा गावातील एक व्यावसायिक आणि त्याच्या मुंबईतील सहकाऱ्याने बनावट कुलमुखत्यार पत्राच्याव्दारे हडप करण्याचा प्रयत्न उघडकीला आला आहे. या महिलेने याप्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना तक्रार केल्या आहेत. आणि या फसवणूक प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
दिवा गावातील व्यावसायिक गोवर्धन चांगो भगत आणि तोहदी अहमद सिराज (रा. साकीनाका, मुंबई) अशी फसवणूक करणाऱ्या इसमांची नावे आहेत. डायघर जवळील पिंपरी गावातील महिला अंजना जिजाराम शिंदे यांनी भगत, सिराज यांच्या विरुध्द नौपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगरमध्ये दोन बेकायदा इमारतींची उभारणी, बनावट कागदपत्रांव्दारे सदनिकांची विक्रीची तयारी
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार अंजना शिंदे यांचे आजोबा धोंडिबा जाधव हे सातारा जिल्ह्यातील तापोळा गावचे मूळ रहिवासी. त्यांची जमीन कोयना प्रकल्पात गेली. त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून शिळफाटा चौका जवळील डायघर येथे सर्व्हे क्रमांक ७५, हिस्सा क्र. ४ येथे २० गुंठे जमीन शासनाकडून १९८४ मध्ये मिळाली. धोंडिबा यांच्या मृत्युनंतर त्यांच्या वारसांची नावे या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर लावण्यात आली आहेत. अंजना यांचे वडिल नाना जाधव यांचे २००४ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने तक्रारदार अंजना यांचे वारस म्हणून डायघर येथील सातबारा उताऱ्यावर नाव लागले.
हेही वाचा >>> शिवसेना-भाजपाच्या दहीहंड्यांमुळे डोंबिवलीत रस्ते वाहतुकीत बदल
२०१६ मध्ये अंजना शिंदे यांना डायघर तलाठी कार्यालयातून त्यांची डायघर येथील जमीन विक्रीची नोटीस प्राप्त झाली. आपण जमीन विक्री व्यवहार केला नसताना आपणास ही नोटीस का आली म्हणून अंजना यांनी डायघर तलाठी कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी दिवा येथील व्यावसायिक गोवर्धन चांगो भगत यांनी एप्रिल २००६ रोजी जाधव कुटुंबीयांकडून डायघर येथील जमिनीचे कधीही न रद्द होणारे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केले असल्याचे आढळले. अंजना यांचे वडिल २००४ मध्य मयत झाले असताना त्यांच्या नावाचे कुलमखत्यारपत्र मात्र २००६ मध्ये केले असल्याचे आढळले. जाधव कुटुंबीयांची परवानगी न घेता गोवर्धन भगत,तोहिद सिराज यांनी ठाणे सह दुय्यम निबंधक कार्यालय एक मध्ये जाधव कुटुंबीयांच्या नावे बनावट व्यक्ति उभ्या करुन जाधव यांची जमीन २९ लाख रुपयांना खरेदीचे दस्त ऐवज तयार केले असल्याचे दिसून आले.
आपल्या मालकीच्या हक्काच्या जमिनीचा बनावट खरेदी विक्री व्यवहार केल्याने अंजना यांनी डायघर पोलीस ठाण्यात गोवर्धन भगत, सिराज यांच्या विरुध्द फसवणुकीची तक्रार केली आहे. ठाणे तहसीलदार, प्रांत कार्यालयाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.