वसई : विरारमध्ये एका व्यावसायिकावर अॅसिड हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मोबीन शेख असे त्यांचे नाव असून या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. विरार पोलीस फरार झालेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
मोबीन शेख (४२) हे विरार पूर्वीच्या गोपचर पाडा येथे राहतात. त्यांचा एलईडी दिव्यांचा व्यवसाय आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते आपल्या घरातून आठवडी बाजार येथे जाण्यासाठी निघाले होते. विरार पूर्वेच्या मकवाना रुग्णालयासमोर दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर अॅसिड असलेली प्लास्टिकची पिशवी फेकली. हा हल्ला चुकवण्यासाठी मोबीन खाली वाकले. मात्र अॅसिडची पिशवी त्यांच्या मानेला लागली. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या हल्ल्यामध्ये त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरोधात कलम ३२६ (ब) ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर कोण आहेत हे स्पष्ट झालेले नाही. अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू असलयाची माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.