येत्या शुक्रवारी होत असलेल्या दहीहंडी उत्सवांसाठी डोंबिवलीतील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर मंडप उभारणीची कामे सुरू झाल्याने आता वळसा घेऊन जावे लागणार, वाहतूक कोंडीत अडकावे लागेल या भीतीने प्रवाशांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. अगोदरच प्रवासी खड्डे, वाहतूक कोंडीने बेजार आहेत. त्यात पालिका, पोलीस, वाहतूक विभाग रस्ते अडवून साजरे होणाऱ्या उत्सवांना परवानगी देत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी दहीहंडी उत्सव असला तरी राजकीय मंडळींचा आशीर्वाद असलेल्या दहीहंडी उत्सव मंडळांनी बुधवार पासून रस्त्यावर मंडप उभारणीचे साहित्य आणून मंडप उभारणीस सुरुवात केली आहे. डोंबिवली पूर्वेत बाजीप्रभू चौकात मंडप उभारणीस सुरुवात झाली आहे. यावेळी प्रथमच सर्वाधिक वर्दळीचा डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्ता सम्राट चौकातील माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवासाठी बुधवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत कल्याण डोंबिवली पालिका, वाहतूक पोलिसांच्या परवानगीने बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, असे वाहतूक विभागाने जाहीर केले आहे.

डोंबिवलीत पूर्वेत बाजीप्रभू चौकात कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सामाजिक संस्थेतर्फे अनेक वर्षापासून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता ओळखला जातो. डोंबिवली शहरा बाहेरून येऊन पुन्हा शहरा बाहेर जाणारे वाहतूक या चौकातून होते. फडके रस्ता आणि मानपाडा रस्ता यांचा जोडबिंदू रस्ता म्हणून बाजीप्रभू चौक ओळखला जातो. चौकात दहीहंडी उत्सव असल्याने चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौकातील रिक्षा चालक, विक्रेत्यांनी अन्य ठिकाणी जाऊन प्रवासी वाहतूक, व्यवसाय करावा लागतो. चौकातील केडीएमटीच्या बस नेहरु रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात. पेंडसेनगर, एमआयडीसी, मानपाडा भागात जाणाऱ्या प्रवाशांना उलट वळसा घेऊन इच्छीत स्थळी जावे लागते. त्यामुळे बाजी चौकातील दहीहंडी उत्सवाबद्दल नागरिकांच्या मनात नाराजी आहे.

दिनदयाळ रस्त्यावरील हॉटेल सम्राट चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत असल्याने या उत्सवासाठी सर्वाधिक वर्दळीचा सम्राट हॉटेल चौक रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. हे उत्सव आडबाजुचा रस्ता किंवा एखाद्या मैदानात घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. उच्च न्यायालयाने वेळोवेळी रस्ते अडवून उत्सव करू नका असे आदेश दिले आहेत. असे असताना ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सम्राट चौक बंद ठेवण्यास परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनीही एवढा महत्वाचा वर्दळीचा रस्ता बंद करण्यास साहाय्यक आयुक्तांना मान्यता दिली कशी असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

सम्राट चौकात विक्रेते, रिक्षा चालक, खासगी वाहने यांची वर्दळ असते. आनंदनगर, मोठागाव,जुनी डोंबिवली, जयहिंद काॅलनी, रेतीबंदर, देवीचापााडा, उमेशनगर भागात जाणारा हा महत्वाचा रस्ता आहे. गुरुवार सकाळ पासून ते शुक्रवार रात्रीपर्यंत सम्राट चौक रस्ता बंद राहणार असल्याने वळण रस्त्याने जावे लागणार असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

सम्राट चौकात मंडप उभारणीला परवानगी दिली की नाही हे आठवत नाही. पण तपासून सांगतो. -राजेश सावंत ,साहाय्यक आयुक्त ,ह प्रभाग.

पालिकेने परवानगी दिल्यामुळे वाहतूक विभागाने सम्राट चौकाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यास मंजुरी दिली आहे. – उमेश गित्ते , पोलीस निरीक्षक ,वाहतूक विभाग

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Busy roads are not being closed for dahi handi celebrations in dombivli amy