डोंबिवली जवळील संदप गावातील एका ४५ वर्षाच्या केबल व्यावसायिकाने गावातील केबल व्यावसायिक १५ स्पर्धकांच्या त्रासाला कंटाळून शनिवारी सकाळी दातिवली-निळजे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अज्ञात एक्सप्रेस समोर आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी केबल व्यावसायिकाने मोबाईलव्दारे दृश्यध्वनी चित्रफित तयार करून ती आपल्या बंधूला पाठविली होती. याशिवाय, मयताने लिहिलेल्या मृत्युपूर्वीच्या दोन चिठ्ठ्या ठाणे, दिवा रेल्वे पोलिसांना मिळाल्या आहेत.केबल व्यावसायिकाने मृत्यूपूर्व तयार केलेली दृश्यध्वनी चित्रफित, त्याने लिहिलेल्या स्वता जवळील आणि घरातील दोन चिठ्ठ्या पोलिसांनी ताब्यात घेऊन चिठ्ठीतील नावांप्रमाणे पोलिसांनी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या उमद्या वयाच्या केबल व्यावसायिकाने केबल व्यवसायातील स्पर्धेला कंटाळून आत्महत्या केल्याने डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> डोंबिवली : शिळफाटा रस्ता बाधितांचे मंगळवार पासून काटई येथे बेमुदत धरणे आंदोलन

प्रल्हाद नारायण पाटील (४५, रा. संदप, डोंबिवली) असे मयत केबल व्यावसायिकाचे नाव आहे. मयताचा भाऊ चद्रकांत पाटील (रा. नारायण स्मृती बंगला, संदप) यांच्या तक्रारी वरुन पोलिसांनी संदप गावातील १५ जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.आरोपींमध्ये गुन्हेगार पार्श्वभुमीच्या संदीप गोपीनाथ माळी (रा. भोपर गाव) यांचा समावेश आहे. इतर आरोपींमध्ये कुंदन गोपीनाथ माळी (रा. भोपर), संदीप उर्फ पिंट्या कान्हा पाटील (संदप), रणदीप उर्फ भाऊ कान्हा पाटील (संदप), हेमंत कान्हा पाटील (संदप), चेतन कान्हा पाटील (संदप), योगेश मधुकर पाटील (संदप), तृप्तीं संतोष पाटील (संदप), प्रथमेश संतोष पाटील (संदप), मधुकर कृष्णा पाटील (संदप), दत्तात्रय कृष्णा पाटील (संदप), प्रवीण पुंडलिक पाटील (संदप), हर्षल दत्तात्रय पाटील (संदप), ऋतिक बळीराम पाटील (संदप), आस्थिक उर्फ लंकेश बळीराम पाटील (संदप) यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> ठाणे : विद्युत मनोरा हटविण्यासाठी रहिवासी आक्रमक

रेल्वे पोलिसांनी सांगितले, केबल, इंटरनेट व्यावसायिक मयत प्रल्हाद पाटील यांचा केबल व्यवसाय होता. लोढा रिजन्सी, मानपाडा येथे त्यांचे कार्यालय होते. दररोज सकाळी पाच वाजता कार्यालयात जाऊन तेथील व्यवस्था लावून ते पुन्हा सकाळी सात वाजता घरी येत होते. मानपाडा, संदप भागात केबल व्यवसायात प्रल्हाद यांची मातब्बरी असल्याने संदप गावातील इतरांना ते सहन होत नव्हते. त्यांनी संदीप माळी, कुंदन माळी यांच्या साहाय्याने प्रल्हादला शह देण्यासाठी केबल व्यवसाय सुरू केला. प्रल्हादला जागोजागी केबल टाकण्यास अडवणूक, त्याच्या केबल कापून टाकण्याचे प्रकार सुरू केले. प्रल्हादाचा केबल व्यवसाय ढबघाईस येईल अशाप्रकारे आरोपींनी प्रल्हादची अडवणूक करून त्याला त्रास देण्यास सुरुवात केली.पिंट्या पाटील, रणदीप पाटील यांनी हेतुपुरस्सर प्रल्हादच्या लोढा रिजन्सी येथील कार्यालया समोर केबल कार्यालय सुरू केले. यावरुन प्रल्हाद, आरोपींमध्ये वाद सुरू झाले. तृप्ती व त्यांचा मुलगा प्रथमेश यांनी वर्षभरापूर्वी केबल व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्याशी वाद सुरू होते, असे फिर्यादी चंद्रकांत पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. याविषयी प्रल्हाद याने मानपाडा पोलीस ठाणे, वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या.

१२ वर्षापूर्वी संदीप माळी व त्याच्या समर्थकांनी प्रल्हादचा भाऊ शिवदास याला गणपती दर्शनावरुन मारहाण केली होती. न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. या प्रकरणातून आरोपी प्रल्हादला त्रास देत होते. पॅनेसिया संकुलात आरोपींनी प्रल्हादला केबल न देण्याची धमकी दिली होती. आरोपींमुळे आपल्या केबल व्यवसायावर परिणाम होत असल्याने प्रल्हाद सतत चिंताग्रस्त होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.शनिवारी (ता.१०) प्रल्हाद नेहमी प्रमाणे सकाळी कार्यालयात गेला. तो नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजेपर्यंत घरी न परतल्याने त्याची पत्नी सपना यांनी आपल्या भावजयला फोन करुन कळविले. तात्काळ प्रल्हादचे भाऊ शिवदास त्याचा तपास करू लागले. प्रल्हादने आपणास आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ पाठविला असल्याचे शिवदासच्या निदर्शनास आले. उसरघर गावचे दिनेश संते यांनी प्रल्हादच्या भावांना संपर्क करुन प्रल्हाद जखमी अवस्थेत दातिवली-निळजे दरम्यान रेल्वे मार्गात पडला आहे असे कळविले. त्यांना मुंब्रा येथील बालाजी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.दिवा, ठाणे पोलिसांनी मयत प्रल्हादची झडती घेतली. त्याच्या जवळ आणि घरात एक चिठ्ठी आढळून आली.या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल तपास सुरू केला आहे. आत्महत्येनंतर कुटुंबीयांना त्रास नको म्हणून प्रल्हादने आपली तसबीर, बँकेतून पैसे काढून आणून घरात ठेवले होते, असे स्थानिक रहिवासी सांगतात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cable businessman from sandap village near dombivli committed suicide on the railway track due to the harassment of competitors amy