|| ऋषिकेश मुळे

प्राण्यांच्या हालचाली टिपता येणार; वन्यजीव अभ्यासाला बळ

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वन परिक्षेत्रातील वन्यजीवांची माहिती समोर यावी तसेच त्यावर संशोधन करता यावे, याकरिता उद्यान विभागाच्या वतीने वन परिक्षेत्रात विविध ठिकाणी कॅमेरे ट्रॅपिंग करण्यात येत आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभाग, वन्यजीव संशोधक निकित सुर्वे आणि समूहाच्या वतीने येऊर वन परिक्षेत्रात गेल्या महिनाभरापासून हे कॅमेरे लावण्यात येत आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये बिबटय़ा, हरिण आणि सांबार यांसारख्या विविध प्राण्यांची छायाचित्रे टिपण्यात यश आले आहे.

येऊर वन परिक्षेत्रातील प्राण्यांची नुकतीच गणना झाली. या वेळी जंगलात विविध प्रकारचे एकूण १५७ वन्यप्राणी असल्याचे येऊर वन विभागाकडून सांगण्यात आले. मात्र येऊरचा वन परिसर ठाणे शहराला अगदीच लागून असल्यामुळे येथून नागरी वस्त्यांमध्ये प्राण्यांचा शिरकाव होण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तसेच प्राण्यांचे जंगलातील वास्तव्य, जीवनमान यांचा अभ्यास करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, वन्य संशोधक निकित सुर्वे यांच्या वतीने येऊर वन क्षेत्रात कॅमेरे बसवण्यात येत आहेत. वन परिक्षेत्रातील झरे, पाणवठे, गर्द जंगल अशा महत्त्वाच्या ठिकाणी १८ मेपासून कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाली असल्याचे निकित सुर्वे यांनी सांगितले.  बिबटे तसेच इतर वन्य प्राण्यांची आवड असणारी तरुण मुलेही या कॅमेरे ट्रॅपिंगच्या मोहिमेत

सहभागी झाली आहेत. कॅमेरे ट्रॅप करताना विविध अनुभव येत असल्याचे सहभागी स्वयंसेवकांनी सांगितले.

कॅमेरा ट्रॅपिंगची पद्धत

  • हाताएवढय़ा आकाराचा असणारा हा कॅमेरा वन्यप्राण्यांच्या ट्रॅपिंगसाठी वापरला जातो. हा कॅमेरा झाडांवर बांधण्यात येतो.
  • कोणत्या आकाराचा आणि कोणता प्राणी या ठिकाणाहून जाईल याकरिता योग्य अंदाज घेऊन कॅमेरा निश्चित ठिकाणी लावण्यात येतो.
  • या कॅमेऱ्यांना सेन्सर असतो. कॅमेऱ्यांच्या समोरून एखादा प्राणी गेल्यास क्षणाचाही विलंब न लागता कॅमेऱ्यामध्ये त्या प्राण्याचे छायाचित्र उमटते. कॅमेरा सुरू राहण्याची क्षमता सात दिवसांची असते.

स्वयंसेवकांचे अनुभव

एकदा कॅमेरा ट्रॅप करण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी माकडांचा मोठय़ाने आवाज येत होता. काहीच अंतरावर बिबटय़ा असल्याची चाहूल लागली. बिबटय़ाच्या पायांचे ठसेही त्या ठिकाणी दिसून आल्याचे स्वयंसेवक ओमकार पाटील याने सांगितले. ओमकार हा प्राणिशास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे. मामा भांजे येथील भागात कॅमेरे ट्रॅप करण्यासाठी जात होतो, त्या वेळी बिबटय़ाची ताजी विष्ठा दिसून आली. काहीच अंतरावरून माकडे एकाच दिशेकडे पाहून ओरडत असल्याचे पाहायला मिळाले. यावरून त्या ठिकाणीही बिबटय़ा असल्याचे निष्पन्न झाल्याचे स्वयंसेवक ऋषिकेश वाघ याने सांगितले.

येऊरमधील कॅमेरा ट्रॅपमध्ये विविध प्राणी दिसून येत आहेत. या छायाचित्रांचा योग्य अभ्यास करून त्याचा फायदा पुढील संशोधनासाठी करता येणार आहे. यंदाचे कॅमेरा ट्रॅपिंगचे तिसरे वर्ष आहे.   -निकित सुर्वे, वन्यजीव संशोधक

पर्यावरण जपले तरच प्राण्यांचे अस्तित्व कायम राहील. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत. कॅमेरा ट्रॅपिंग हा यासारखाच एक उपक्रम आहे.     -राजेंद्र पवार, येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी