लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण- ठाणे जिल्हा भाजपचे ग्रामीण अध्यक्ष मधुकर मोहपे यांनी मनमानी करुन ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण ग्रामीण भागात काम सुरू केले आहे. त्यांच्या या गटातटाच्या राजकारणामुळे ठाणे ग्रामीण भागात पक्ष वाढीऐवजी पक्ष खिळखळा होत आहे, अशा तक्रारी ठाणे ग्रामीण भागातील भाजपच्या दीड हजार कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केल्या. तक्रारी करणाऱ्यांमध्ये मुरबाडचे आ. किसन कथोरे यांचे समर्थक आघाडीवर होते. मोहपे यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करणारी ८०० निवेदने प्रदेशाध्यक्षांना कार्यकर्त्यांनी दिली.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे खास समर्थक मधुकर मोहपे यांना पाटील यांच्या पाठबळामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद, ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष पद मिळाले आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण भागात कपिल पाटील विरुध्द किसन कथोरे गटात वर्चस्व वादावरुन जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कथोरे यांचे ग्रामीण भागातील वाढते वर्चस्व आणि कथोरे यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर कपिल पाटील विरुध्द कथोरे संघर्ष अधिक पेटला आहे.
आणखी वाचा-डोंबिवलीतील भोपर डी मार्ट भागात महानगरचा घरगुती गॅस पुरवठा सुरू
कथोरे यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पाटील यांनी मोहपे यांना पुढे केले असल्याचे कार्यकर्ते सांगतात. मागील तीन वर्षापासून भाजप मध्ये सक्रिय नसलेले मोहपे यांना अचानक बढती मिळाली. आता ते पक्षात गटबाजी करत असल्याने ग्रामीण कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ग्रामीण भाजपच्या बैठकांना मोहपे यांच्याकडून कथोरे समर्थकांना बोलविले जात नाही. पक्षीय फलकावर कथोरे यांची छबी प्रसिध्द केली जात नाही. जिल्हा व्हाॅट्सप गटातून कथोरे समर्थकांना बाहेर काढले जाते, अशा तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या.
पाटील गटाकडून कथोरे समर्थकांना डावलण्याचा प्रयत्न वाढत चालल्याने मंगळवारी ठाणे ग्रामीण मधील मुरबाड, भिवंडी, शहापूर, कल्याण भागातील भाजपच्या दीड हजार कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची मुंबईतील प्रदेशाध्यक्ष कार्यालयात भेट घेतली. त्याच्या समोर मोहपे यांच्या चुकीच्या कार्यपध्दतीचा पाढा वाचला. मोहपे यांनी आपण नीलेश सांबरे यांच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त एकाही कथोरे समर्थकांना गटातून बाहेर काढले नसल्याचे सांगितले.
आणखी वाचा- डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावरील फेरीवाल्यांचा वाहतुकीला अडथळा
नेमणुकांना स्थगिती
मुरबाड तालुक्याचा विकासात आ. कथोरे यांचे मोठे योगदान आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण पट्ट्यात भाजप वाढीसाठी कथोरे यांचा महत्वाचा सहभाग आहे. भाजप त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. कोणीही गटाचे राजकारण करुन त्यांचे आणि समर्थकांचे खच्चीकरण करत असेल तर ते सहन करणार नाही, असा दिलासा बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
८ सप्टेंबरपर्यंत जिल्हाध्यक्ष मोहपे यांनी जिल्हा कार्यकारिणी अंतर्गत कोणाच्या नवीन नेमणुका करू नयेत, असे आदेश बावनकुळे यांनी दिले. येत्या निवडणुकीत ए, बी अर्ज कोण देईल याची चिंता कार्यकर्त्यांनी करू नये. कपिल पाटील, किसन कथोरे यांची प्रदेश नेत्यांबरोबर एकत्रित बैठक होईल. त्यात सामोपचाराने चर्चा होऊन एकवाक्यतेचा निर्णय होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी दिला. यावेळी भाजपचे संभाजी शिंदे, राजेंद्र घोरपडे, रवींद्र घोडविंदे, अरुण पाटील, राजेश पाटील, मेघराज तुपांगे, अनिल घरत, रवींद्र चंदे, उल्हास बांगर उपस्थित होते.