कल्याण– गटार, नाले, रस्त्यांना अडथळे ठरणाऱ्या चोरीच्या नळजोडण्या तोडण्याची मोहीम कल्याण पूर्वेतील आय प्रभागाने सुरू केली आहे. या नळ जोडण्यांमुळे अनेक ठिकाणी कचरा साचतो. पावसाचे पाणी अडून राहते. त्यामुळे जमिनी खालून, गटार, नाल्यांमधून घेतलेल्या अशाप्रकारच्या सर्व चोरीच्या नळजोडण्या तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली.
आय प्रभागातील माणेरे, चिंचपाडा परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबले असल्याच्या तक्रारी आय प्रभागात आल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने साहाय्यक आयुक्त मुंबरकर, अधीक्षक किशोर खुताडे आणि अतिक्रमण नियंत्रण पथकाने पाहणी केली. अनेक ठिकाणी चोरीच्या नळ जोडण्या गटार, नाले, रस्त्यांना अडथळा होईल, अशा पध्दतीने चोरुन घेतल्या आहेत, असे निदर्शनास आले.
साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्या आदेशावरुन अतिक्रमण नियंत्रण पथकाने माणेरे, चिंचपाडा, आय प्रभागाच्या विविध भागातील ५० हून अधिक चोरीच्या नळ जोडण्या तोडून टाकल्या. यावेळी स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. परंतु, पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून त्यांनी केलेल्या चोरीच्या नळ जोडण्यांची माहिती दिली. या नळ जोडण्या दलालांनी रहिवाशांकडून पैसे घेऊन दिल्या आहेत, असे रहिवाशांनी सांगितले.या चोरीच्या नळ जोडण्या असल्याने त्या तोडण्यात येतील, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी रहिवाशांना सांगितले. पालिकेकडे नळ जोडणीसाठी विहित मार्गाने अर्ज करा. त्याप्रमाणे आपणास नळ जोडणी देण्याचा विचार केला जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले. अनधिकृत बांधकामांबरोबर आय प्रभाग हद्दीतील चोरीच्या नळ जोडण्या तोडण्याची मोहीम सुरूच ठेवणार आहोत, असे मुंबरकर यांनी सांगितले.