बदलापूरः मुरबाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपात समेट घडवून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप उमेदवार किसन कथोर यांच्यासाठी लहान सभा आणि प्रचार फेऱ्या सुरू केल्या होत्या. मात्र त्यानंतरही शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार सुभाष पवार यांचा प्रचार सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. याबाबतची एक चित्रफीत सोमवारी समाजमाध्यमांवर प्रसारीत झाल्याने एकच खळबळ उडाली.
मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील प्रमुख घटक पक्षांमधील संदोपसुंदी संपताना दिसत नाही. विद्यमान भाजप आमदार आणि महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्याविरूद्ध शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे उभे ठाकले आहेत. सध्या तरी म्हात्रे थेट कथोरे यांना विरोध करत नसले तरी ते प्रचारातही सक्रीय नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या समर्थक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना आगामी पालिका निवडणुकांमध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत सांगितले. आज भाजपचा प्रचार केला तरी उद्या भाजपचाच उमेदवार पालिकेत उभा असेल, असे सांगितल्याची माहिती होती. मात्र त्यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढे येत भाजप आणि शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक आयोजीत केली. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही लहान सभाही आयोजीत करण्यात आल्या. त्यामुळे शिवसेना आमदार किसन कथोर यांच्या प्रचारात सक्रीय असल्याचे महायुतीत सकारात्मक चित्र दिसू लागले होते.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
मात्र त्याचवेळी सोमवारी सायंकाळच्या सुमारास बदलापूर पश्चिमेत काही शिवसेना महिला कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमदेवार सुभाष पवार यांचे माहितीपत्रक वाटत असल्याची चित्रफीत प्रसारीत झाली आणि एकच खळबळ उडाली. शिवसेना आणि आमदार किसन कथोरे यांच्यात समेट झाल्यानंतरही शिवसेनेचे पदाधिकारी उघडपणे विरोधी उमेदवाराचा प्रचार कसा करू लागले, असे प्रश्न उपस्थित झाले. यामुळे महायुतीत अजुनही सारे काही आलबेल नसल्याचीच चर्चा रंगली आहे. या पदाधिकाऱ्यांन नेमका कुणाचा आदेश होता, कुणाच्या इशाऱ्यावर विरोधी पक्षाचा उघड प्रचार करण्यास सुरूवात झाली, असा प्रश्न आता चर्चिला जाऊ लागला आहे. याबाबत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली नाही.
© The Indian Express (P) Ltd