कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर केली असताना, शुक्रवारी ठाकरे गटातील कल्याणचे माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
रमेश जाधव यांनी बंडोखोरी केली असल्याची चर्चा आहे. पण, जाधव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपणास मातोश्रीवरून संपर्क साधण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपणास कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सूचना केली. त्या सूचनेचे पालन करून आपण उमेदवारी अर्ज भरत आहोत, असे स्पष्ट केले आणि बंडखोरीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारात आघाडीवर असलेले कल्याण उपशहर जिल्हा संघटक हर्षवर्धन पालांडे आणि इतर शिवसैनिक त्यांच्या सोबत होते. महाविकास आघाडीच्या उमेदवार दरेकर यांच्या प्रचाराचा झंझावत सुरू असताना रमेश जाधव यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने विविध चर्चाना उधाण आले आहे.
उमेदवारी अर्ज छाननी होण्यापूर्वी कोणताही धोका नको म्हणून पर्यायी व्यवस्था म्हणून जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे, असे ठाकरे गटातील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. छाननीची प्रक्रिया पार पडली आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जाधव उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले. रमेश जाधव यांची कल्याण शहराचे विधानसभेत नेतृत्व करण्याची अनेक वर्षांची इच्छा आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मोदी को हराना मुश्कीलही नही…
बिचुकले उमेदवार
बिग बाॅस कार्यक्रमातील सहभागी अभिनेते अभिजीत बिचुकले यांनी शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. संविधानाचे संरक्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण काही विधायक सूचना केल्या होत्या, त्या सूचनांचे पालन किंवा त्या विषयावर त्यांनी आपणास कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. स्वार्थासाठी ही मंडळी देशहिताचे कारण देत राजकारण देत आहेत, या मंडळींच्या स्वार्थीपणाला धडा शिकविण्यासाठी आपण सातारा आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवित आहोत, असे बिचकुले यांनी सांगितले.