लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील दिवे अंजूर भागात सोमवारी सकाळी एका कारला अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात वाहतुक कोंडी झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या मार्गावर खारेगाव टोलनाका ते मानकोली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कोंडी सोडविण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई नाशिक महामार्गावरून दिवसाला हजारो वाहनांची वाहतुक होत असते. मुंबईहून नाशिक, भिवंडी, कल्याणला जाण्यासाठी वाहन चालक याच मार्गाचा वापर करतात. तसेच मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांचीही वाहतुक या मार्गावर अधिक असते. सोमवारी सकाळी मुंबई नाशिक महामार्गावरून कार नाशिकच्या दिशेने वाहतुक करत होती. ही कार दिवे अंजूर भागात आली असता, अचानक कारच्या पुढील भागात आग लागली. या घटनेनंतर परिसरात वाहतुक कोंडी झाली. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला. खारेगाव टोलनाका ते मानकोली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती ठाणे वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. वाहतुक कोंडी सोडविण्याचे कार्य पथकाकडून सुरू आहे.

आणखी वाचा-नववर्षाच्या पूर्वसंध्येला कल्याण, डोंबिवलीत १७० तळीरामांवर कारवाई

दरम्यान, या घटनेत कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. आगीमुळे कारचा पुढील भाग जळून खाक झालेला आहे. या आगीमुळे धुराचे लोटही पसरले आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर रस्ते रुंदीकरणाचे कार्य सुरू आहे. या कामामुळे येथील रस्ता काही भागात अरुंद आहे. त्यातच, या घटनेमुळे वाहतुक खोळंबली होती. मात्र आता आगीवर नियंत्रण मिळविले आहे आणि कोंडी सुटली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car catches fire on mumbai nashik highway traffic jam on the highway mrj