ठाणे : घोडबंदर येथील गायमुख भागात मंगळवारी रात्री एका कारने अचानक पेट घेतला. कार पेट घेत असताना वाहन चालकाने वाहन सोडून पलायन केले. कार पूर्णपणे जळाली असून या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने कार चालक वाहतुक करत होता. मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तो कारने गायमुख येथील टीएमटी बस थांब्याजवळ आला असता, त्याच्या कारमधून अचानक धूर येऊ लागला. वाहन चालकाने तात्काळ कार रस्त्यालगत उभी करून तेथून पलायन केले. त्यानंतर अवघ्या काही क्षणात कारने पेट घेतला. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल, कासारवडवली वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. सुमारे पाऊण तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविणे पथकांना शक्य झाले. या घटनेत कार पूर्णपणे जळालेली आहे.