डोंबिवली : डोंबिवली पूर्व भागातील शिळफाटा रस्त्यालगतच्या सोनारापाडा येथील शंकरानगर भागात सोमवारी दुपारी कारने एका महिलेच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत महिला दुचाकीसह रस्त्याच्या बाजुला फेकली गेली. या महिलेच्या हात आणि पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत. आजारी असलेल्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गौरव नावाच्या मोटार कार चालकाने ही धडक दिली आहे, असे महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. सोनारपाडा येथील समर्थ खासगी शिकवणी वर्ग शंकरानगर भागात हा अपघात घडला.
(ठाण्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आग, ६५ प्रवाशी बचावले)
पोलिसांनी सांगितले, श्वेता ओमकार (रा. शंकरानगर, सोनारपाडा) या आजारी आहेत. त्या तब्येत ठीक नसल्याने उल्हासनगर येथील त्यांच्या परिचित डाॅक्टरकडे उपचारासाठी दुचाकीवरून गेल्या होत्या. उपचार घेऊन त्या सोमवारी दुपारी तीन वाजता शंकरानगरमधील समर्थ कोचिंग क्लासजवळील रस्त्यावरून जात होत्या. समोरून गौरव नावाचा मोटार चालक भरधाव मोटार घेऊन येत होता व त्याने मोटारीने श्वेता यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या धडकेत त्यांच्या सर्वांगाला दुखापत झाली आहे. मानपाडा पोलिसांनी गौरवविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला आहे.