वाहनतळांचे पुरेसे नियोजन नसल्यामुळे ठाणे, कल्याण यांसारख्या शहरांमध्ये जागोजागी रस्त्यांच्या कडेला वृक्षांच्या सावलीत वाहने उभी केली जातात. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत वृक्षांची ही सावली पावसाळ्यात मात्र वाहन मालकांच्या मनात धडकी भरवू लागली आहे. पावसाळा तोंडावर येताच धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण हाती घेणारी महापालिका शहरात धोकादायक वृक्षांचा मात्र विचारच करत नाही. वृक्ष उन्मळून एखादा अपघात होऊ शकतो, कुणाचे जीव जाऊ शकतात या अंगाने विचारच होताना दिसत नाही. त्यामुळे शहरात धोकादायक वृक्ष किती तसेच कोणत्या भागात आहेत, याचे कोणतेही सर्वेक्षण होताना दिसत नाही.

ठाणे महापालिकेच्या वृक्ष विभागामार्फत चार वर्षांनी शहरातील वृक्षांची गणना करण्यात येते. वृक्षांच्या प्रजातीनुसार त्यांची गणना करण्यात येते, तसेच शहरातील मोठय़ा वृक्षांची वेगळी नोंद घेतली जाते. याशिवाय, जुन्या वृक्षांची आयुर्मानानुसारही नोंद करण्यात येते. वृक्षांची गणना करताना एखादा वृक्ष मरणावस्थेत आढळला तर त्याची दफ्तरी नोंद करण्यात येते. असे असले तरी वृक्षांची गणना करताना त्यामध्ये धोकादायक वृक्षांची नोंद घेण्यात येत नाही. त्यामुळे शहरात नेमके किती धोकादायक वृक्ष आहेत, याविषयी महापालिका अनभिज्ञ आहे. शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा मोठय़ा प्रमाणात वृक्ष आहेत. त्यापैकी काही धोकादायक वृक्ष दरवर्षी उन्मळून पडत आहेत. पावसाळ्यात असे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रमाण मोठे आहे. याशिवाय काही झाडांच्या फांद्याही पडत असल्याचे प्रकार घडत आहेत. शहरात पुरेशी वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने वाहने रस्त्याच्या बाजूला उभी राहतात. मात्र या वाहनांवर वृक्ष उन्मळून पडत असल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. अशा घटना गेल्या काही वर्षांपासून शहरात घडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील वाहनचालक धास्तावले असून वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. महापालिकेमार्फत धोकादायक वृक्षांची गणना होत नसल्यामुळे शहरातील कोणत्या रस्त्यांवर असे वृक्ष आहेत, याविषयी ठाणेकरही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांखाली वाहने उभी करणे ठाणेकर टाळत असल्याचे चित्र आहे. शहरात पुरेशी पार्किंगची सोय नाही आणि त्यात रस्त्याच्या बाजूची धोकादायक झाडे कोसळतात, यामुळे ठाणेकरांची अवस्था ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी काहीशी झाली आहे. ठाण्यातील काही मोठय़ा शाळांच्या परिसरात मोठी झाडे आहेत. या झाडांची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे, असे मत खुद्द पर्यावरणप्रेमीही व्यक्त करतात. मुसळधार पावसात एखादे झाड उन्मळून पडल्यास या भागात मोठी दुर्घटना होण्याची भीती नाकारता येत नाही.

 

Story img Loader