बदलापूरः ज्या शहरात वाहनाने प्रवास करत नाही त्या शहरात नियम मोडल्याबद्दल गाडीला दंड येत असल्याचा प्रकार उल्हासनगरात समोर आला आहे. उल्हासनगरातील एका व्यक्तीच्या वाहनाचा नंबर कल्याणमधील एका वाहनचालकाने आपल्या गाडीला लावला असून त्याने तिकडे नियमभंग केला की इकडे या व्यक्तीच्या वाहनाला दंड बसत असल्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे उल्हासनगरातील तो दुचाकीमालक त्रस्त आहे.  काही दिवसांपूर्वी एकाच नंबरच्या दोन रिक्षा वाहतूक पोलिसांनी पकडल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतुकीचे नियम मोडतोय एक जण आणि त्याचा दंड भरतोय दुसराच असा काहीसा प्रकार पुन्हा उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. उल्हासनगर कॅम्प २ मध्ये राकेश कारीरा नामक राहत असून त्यांची एमएच ०५ डीक्स ६२४० क्रमांकाची पांढरी ऍक्टिव्हा कंपनीची दुचाकी आहे. या गाडीला दंड लागल्याचे मेसेज कारीरा यांना दर महिन्याला येतात. मात्र दंडाच्या पावतीसोबत आलेला फोटो बारकाईने पाहिला असता त्याच नंबरची बर्गमॅन कंपनीची दुचाकी दिसते. त्यामुळे कारीरा यांच्या गाडीचा नंबर लावून बर्गमॅन चालक गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे. कल्याण परिसरात गाडीला हे दंड लागत असून २०२२ पासून हा दंड मात्र कारीरा यांना भरावा लागतो आहे. याबाबत त्यांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रारही केली, पण त्यावर अद्यापही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यापूर्वी रिक्षाबाबत असाच प्रकार उल्हासनगर शहरात एका कारवाई दरम्यान वाहतूक पोलिसांनी एक रिक्षा थांबवून तिची तपासणी सुरू केली असता तशाच क्रमांकाची दुसरी रिक्षा समोरून येताना दिसली. त्यामुळे ही थांबवल्यानंतर एकाच क्रमांकाच्या दोन रिक्षा शहरात चालत असल्याचे दिसून आले होते. त्यातील कागदपत्रांची तपासणी केली असता एक रिक्षा बनावट असल्याचे समोर आल्याने त्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गेल्या काही महिन्यात प्रामाणिक रिक्षाचालकाला हजारोंचा भूर्दंड सहन करावा लागला होता. त्यामुळे असे काही प्रकार समोर आल्यास तात्काळ तक्रार करण्याचे वाहतूक पोलीस सूचवत आहेत.