कल्याण – येथील पश्चिमेतील खडकपाडा भागातील ओम डायग्नोसिस केंद्रातील एका तंत्रज्ञाला याच केंद्रातील एका डाॅक्टरने शुक्रवारी रात्री खोलीत कोंडून ठेवले. तंत्रज्ञाने पोलिसांना संपर्क केल्यानंतर पोलिसांनी निदान केंद्रात येऊन त्याची सुटका केली. हा प्रकार करणाऱ्या डाॅक्टर विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
डाॅ. डी. एस. पाटील (३८, रा. छत्री बंगल्या जवळ, रामबाग, गल्ली क्र. चार, कल्याण पश्चिम) असे गुन्हा दाखल झालेल्या डाॅक्टरचे नाव आहे. ओम डाॅयग्नोसिस केंद्रातील तंत्रज्ञ सुनील महांतप्पा तिळगुळे (३६, रा. जयाबाई बेतुरकर चाळ, खडकपाडा, कल्याण) असे तक्रारदाराचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, तंत्रज्ञ तिळगुळे ओम निदान केंद्रात तंत्रज्ञ म्हणून नोकरी करतात. शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता ते आपल्या निदान केंद्रातील खोलीत कार्यरत होते. त्यावेळी तेथे डाॅ. डी. एस. पाटील आले. तिळगुळे यांनी डाॅ. पाटील यांना इकडे या असा इशारा केला. त्याचा राग डाॅ. पाटील यांना आला. त्यांनी तिळगुळे यांच्या दिशेने रागाने हातवारे करून तू केंद्रातील खोलीतच मर असे बोलून तेथून निघून गेले. बाहेर पडल्यानंतर डाॅ. पाटील यांनी तंत्रज्ञ तिळगुळे असलेल्या खोलीचे लोखंडी दार बाहेरून बंद केले. तिळगुळे यांनी विनंती करूनही डाॅक्टरांनी दरवाजा उघडला नाही. ते तिळगुळे यांना एकटेच सोडून तेथून निघून गेले.
हेही वाचा – शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
रात्रभर खोलीत अडकून पडू या विचाराने तिळगुळे यांनी पोलिसांच्या सेवा संपर्क क्रमांकावर संपर्क साधला. मदतीची याचना केली. तात्काळ खडकपाडा पोलिसांचे पथक ओम निदान केंद्रात आले. त्यांनी बंदिस्त केलेल्या तंत्रज्ञाची खोलीतून सुटका केली. तिळगुळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डाॅ. पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डाॅक्टरांनी का केला, याचा तपास पोलीस करत आहेत.