कल्याण – उल्हासनगर येथे एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना आपल्या माळशेज घाट भागातील करंजाळे येथील शेतघरात आश्रय दिल्याच्या आरोपातून उल्हासनगर पोलिसांनी डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव आणि शेतघराच्या मालकीण गीता खरे यांच्यासह चार जणांवर मंंगळवारी गुन्हा दाखल केला.

रुतिक उर्फ अटल अनिल शुक्ला (रा. म्हारळ, उल्हासनगर), गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ), सुमीत सत्यवान सैनी (रा. योगीधाम, कल्याण), शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक जनार्दन ठाकरे (रा. कल्याण) आणि शेतघराच्या मालकीण गीता खरे अशी आरोपींची नावे आहेत. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन बबनराव पत्रे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीत समुह विकास योजना राबविण्याला सर्वाधिक प्राधान्य; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची माहिती

पोलिसांनी सांगितले, उल्हासनगर पोलीस ठाणे हद्दीत एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तीन ते चार जणांनी केला होता. या प्रकरणातील आरोपी गुन्हा करून फरार झाले होते. उल्हासनगर पोलीस शोध घेत होते. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी माळशेज घाटातील ओतुर पोलीस ठाणे हद्दीतील करंजाळे शेतघरात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. साहाय्यक पोलीस निरीक्षक पत्रे, उपनिरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक करंजाळे येथे पोहचले.

रात्रीच्या वेळेत ओतुर पोलिसांच्या साथीने उल्हासनगर पोलिसांंनी शेतघरावर छापा टाकला. तेथे १५ जण होते. सहा इसम पोलिसांना पाहून पळून गेले. शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना पोलिसांनी या शेतघरात आरोपींची नावे वाचून दाखवून ते येथे राहतात का म्हणून विचारणा केली. प्रतीकने अटल शुक्ला याच्या सूचनेवरून सोहन पवार, धीरज रोहेरा, यश पवार येथे राहत आहेत असे सांगितले. हेच गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांंनी त्यांना ताब्यात घेऊन उल्हासनगर येथे आणून अटक केली.

हेही वाचा >>>कल्याणमधील गांधारी नदीत गाळात अडकलेल्या वृध्द महिलेला वाहतूक पोलिसांनी वाचविले

अटल शुक्ला याने शेतघराचा व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना येथे राहणारे तीन लोक हे उल्हासनगर मधील गंभीर गुन्हयातील आरोपी आहेत. त्यांची राहणे, भोजनाची व्यवस्था कर, अशी सूचना केली होती. त्यामुळे तिघांना या शेतघरात आश्रय मिळाला होता, असे पोलीस तपासात उघड झाले. अटल शुक्लाला गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ) याने शेतघराचा संदर्भ दिला होता. तीन जण गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत हे माहिती असुनही त्यांची माहिती पोलिसांपासून लपवली आणि गन्हेगारांना शेतघरात आश्रय देण्यासाठी पुढाकार घेतला म्हणून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader