उल्हासनगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सिंधी समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर उल्हासनगर शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष जमनादास पुरस्वानी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उल्हासनगर कॅम्प पाच येथील नेताजी चौक भागात उल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना “एक शेर को मारने के लिए १०० सिंधी कुत्ते भी कुछ नही कर सकते” असे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर उल्हासनगर शहरातील सिंधी बांधवांनी समाज माध्यमांतून निषेध व्यक्त केला. तर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी आव्हाडांच्या या वक्तव्यावर टीका केली होती. या वक्तव्याचा निषेधही केला. याविरुद्ध भाजपने आक्रमक भूमिका घेत आव्हाड यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याचे आवाहन केले होते.
हेही वाचा >>>शिवसेनेच्या ठाकरे गटाची कार्यकारिणी जाहीर, शिवसेनेच्या नियुक्त्या मात्र रखडलेल्याच
जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित करत वक्तव्याचा विपर्यास केला असून आपण असे वक्तव्य केलेच नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर अखेर गुरुवारी भाजप जिल्हाध्यक्ष जमनादास पुरस्वानी हिल लाईन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .आम्हा सिंधी धर्मियांच्या भावना दुखवण्याच्या हेतून वक्तव्य करून सिंधी समाजाच्या भावना आव्हाड यांनी दुखावल्या. तसेच एकोपा टिकण्यास बाधक कृती करून सिंधी धर्मियांचे धार्मिक श्रध्दांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागण्याची संधी गमावली. त्यामुळे आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, जमनादास पुरस्वानी यांनी दिली. आता आव्हाड वक्तव्य करत असताना मंचावर बसून टाळ्या वाजवणारे आणि हसणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उल्हासनगर शहरातील पदाधिकारी यांनी माफी मागावी, असे आवाहन पुरस्वानी यांनी केले आहे.