ठाणे : दिवा येथील शिंदे गटाचे उपशहरप्रमुख ॲड. आदेश भगत यांच्याविरोधात भाजपाचे पदाधिकारी रोहीदास मुंडे आणि ज्योती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर आदेश भगत यांनीही काही दिवसांपूर्वी रोहीदास मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आता दिव्यात भाजपा आणि शिंदे गटामधील वाद अधिक वाढत असल्याचे चित्र आहे.
दिवा येथे रुग्णालय व्हावे या मागणीसाठी भाजपाचे दिवा मंडळ अध्यक्ष रोहीदास मुंडे आणि ज्योती पाटील यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांनी दिवा येथील शिंदे गटाचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांविरोधात टीका केली होती. त्यानंतर शिंदे गटाचे उपशहरप्रमुख आदेश भगत यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात रोहीदास मुंडे यांनी बदनामी केल्याचा आरोप करत तक्रार नोंदविली होती. त्यानुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात रोहीदास मुंडे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. तर, रोहीदास मुंडे आणि ज्योती पाटील यांनीही ठाणे पोलिसांकडे तक्रारी अर्ज केला होता. या तक्रारीनुसार, आता आदेश भगत यांच्याविरोधातही मुंब्रा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपामधील वाद आणखी वाढत असल्याचे चित्र आहे.