लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील केळकर रस्त्यावर शुक्रवारी सकाळी एका शाळेच्या बस चालकाने रस्ता ओलांडत असताना बस बेदरकारपणे चालवून एका वृध्देला ठोकर दिली होती. या धडकेत या वृध्देचा जागीच मृत्यू झाला होता.
याप्रकरणी रामनगर पोलिसांनी शुक्रवारी तात्काळ बस चालकाला ताब्यात घेतले होते. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत मयत वृध्द महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून शाळेच्या बस चालकाविरुध्द शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सुप्रिया अशोक मराठे (६८) असे मयत महिलेचे नाव आहे. या महिलेचा भाऊ सुधीर दत्तात्रय फडके (७०) यांनी या अपघात प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. बस चालक दिगंबर मधुकर मेस्त्री (४३, रा. कोपरगाव, डोंबिवली) असे गुन्हा दाखल चालकाचे नाव आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील एका प्रसिध्द शाळेची बस केळकर रस्त्यावरून शुक्रवारी सकाळी धावत होती. दिगंबर मेस्त्री या बसचे सारथ्य करत होते. शाळेची बस केळकर रस्त्यावरून सुभाष डेअरी भागातून धावत असताना त्या वेळेत सुप्रिया अशोक मराठे केळकर रस्त्यावरून जात होता. त्या रस्ता ओलांडत असताना त्यांना बसची जोराची धडक बसली. त्या जागीच कोसळल्या. त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना पादचाऱ्यांनी तात्काळ उर्सेकरवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
मयत सुप्रिया मराठे आणि त्यांचे पती अशोक हे रामनगर भागात राहत होते. पती अशोक हेही वयोवृध्द आहेत. या अपघातामुळे पालिका, पोलीस आणि वाहतूक विभागाने केळकर रस्त्यावरील रिक्षा वाहनतळ, या भागातील अरूंद रस्ता, एकेरी वाहतूक मार्गिका याविषयी कठोर निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी केळकर रस्त्यावर उर्सेकरवाडीमध्ये रिक्षेसह सह कोणत्याही मोठ्या प्रवेश करू नये म्हणून केळकर रस्त्यावर उर्सेकवाडीच्या मार्गावर वासुदेवलक्ष्मी सोसायटीच्या बाजुला लोखंडी रस्ता रोधक लावण्यात आले होते. त्यामुळे कोणीही वाहन चालक केळकर रस्त्यावरून उर्सेकरवाडीत प्रवेश करत नव्हता.
या वाहन चालकांना रामनगर मधील स्वामी समर्थ मठाजवळच्या आणि वाहतूक पोलीस कार्यालयासमोरील रस्त्यावरून उर्सेकरवाडीत प्रवेश करावा लागतो. आता टेम्पो, रिक्षा, मोटार, दुचाकी स्वार असा प्रत्येक वाहन चालक केळकर रस्त्यावरून उर्सेकरवाडीत जातो. त्यामुळे हे वाहन वळत असताना केळकर रस्त्यावर अभूतपूर्व कोंडी होते. या वळण रस्त्यावर रिक्षा वाहनतळ आहे. रस्त्यावरील रिक्षा चालक प्रवासी उतरून भाडे देईपर्यंत रिक्षा जागची हटवत नाहीत. दिवसेंदिवस केळकर रस्ता अपघातग्रस्त रस्ता होऊ लागला आहे, अशा तक्रारी स्थानिक रहिवासी, व्यापाऱ्यांनी केल्या.