डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील सोनारपाडा भागात एका कंपनी मालकाने एका महिलेला आपल्या कंपनीत स्वीय साहाय्यक पदावर नेमणूक दिली. ही नेमणूक देताना कंपनी मालकाने महिलेला हे पद सांभाळत असताना आपणास माझ्या बरोबर शरीर संबंध ठेवावे लागतील, असे फोनवरून सांगितले. या घडल्या प्रकाराबद्दल महिलेने तीव्र संताप व्यक्त करत रामनगर पोलीस ठाण्यात कंपनी मालका विरुध्द बुधवारी तक्रार केली आहे.
तक्रारदार महिला या डोंबिवली परिसरात राहतात. त्या खासगी नोकरी करतात. गुन्हा दाखल कंपनी मालक हे २५ वर्षाच्या वयोगटातील पंजाबी वेशातील असल्याचे महिलेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. या कंपनी मालकाची कंपनी सोनारपाडा भागात आहे. गेल्या महिन्यात संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यान फोनवरील बोलण्यातून हा प्रकार घडला आहे.
या घडल्या प्रकारा विषयी महिलेने बुधवारी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.तक्रारदार महिलेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की जाॅब है या संकेतस्थळावर महिलेने टेलिकाॅलिंग या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरला होता. या संकेतस्थळावर एक मोबाईल क्रमांक होता. महिलेने टेलिकाॅलिंग पदाविषयी जाणून घेण्यासाठी त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. कामाची पध्दत आणि इतर माहिती जाणून घेतली. महिलेने अर्ज केलेल्या ठिकाणी मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क ठेवला होता.
गेल्या महिन्यात संध्याकाळी सात वाजता महिला घरी असताना त्यांना अर्ज केलेल्या ठिकाणाहून संपर्क करण्यात आला. संबंधित कंपनी मालक असलेल्या व्यक्तिने महिलेला फोनवरून सांगितले, की तुमची मुलाखतीची प्रक्रिया पार पडली आहे. आपणास टेलिकाॅलिंग या पदावर काम न करता आपली स्वीय साहाय्यक म्हणून कंपनीत काम करावे लागेल. या कामासाठी तुम्हाला २० हजार रूपये वेतन दिले जाईल. आपली स्वीय साहाय्यक म्हणून काम करताना आपणास माझ्या बरोबर शरीर संबंध ठेवावे लागतील. हे ऐकून तक्रार महिलेने तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करत संबंधित इसमाची हजेरी घेतली. आपल्याशी गैरवर्तन केले म्हणून महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी महिलेला संपर्क करणाऱ्या सोनारपाडा येथील कंपनी मालकाचा तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक मुपेड याप्रकरणाचा तपास करत आहेत.