डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील कुंभारखाणपाडा, नवापाडा भागात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता सात माळ्यांच्या बेकायदा इमारत बांधणाऱ्या चार भूमाफियांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) कायद्याने गुन्हे दाखल करण्यात आले. पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या गुन्ह्यामध्ये डोंबिवलीत सर्वाधिक बेकायदा बांधकामे बांधणारा भूमाफिया प्रफुल्ल मोहन गोरे यांचा समावेश आहे. कुंभारखाणपाडा येथील हरितपट्ट्यात उभारण्यात येत असलेल्या शिव सावली या बेकायदा इमारतीचा प्रवर्तक गोरे आहे. याच गोरेंची डोंबिवलीतील दत्तनगर स्मशानभूमी जवळील सात माळ्यांची बेकायदा इमारत तत्कालीन उपायुक्त पल्लवी भागवत यांनी पाडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली होती. याशिवाय, कोपर प्रभागात सखाराम काॅम्पलेक्स, सुभाष रस्त्यावर मारुती मंदिराजवळ, गोग्रासवाडीमध्ये गोरे आणि भागीदारांनी टोलेजंग बेकायदा इमारती उभारल्या आहेत. डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्यातील ६५ इमारत घोटाळ्यात गोरे यांचा सहभाग आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत विवाहितेवर हल्ला करणाऱ्या तरुणास नाशिकमधून अटक

पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहितीनुसार, भूमाफिया मनोज भोईर, प्रफुल्ल गोरे यांनी डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथील गणेशघाट रस्त्यावर साईलिला चाळ आणि व्दारकामाई इमारतींच्या जवळ पालिकेच्या परवानग्या न घेता एक बेकायदा इमारत नोव्हेंबर २०२० मध्ये उभारण्यास सुरुवात केली होती. तत्कालीन ‘ह’ प्रभाग साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी माफिया मनोज भोईर, प्रफुल्ल गोरे यांना नोटिसा पाठवून बांधकाम परवानगीची कागदपत्र पालिकेत दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच्या नऊ महिने कालावधीत गोरे, भोईर कागदपत्र सादर करू शकले नाहीत. हे बांधकाम तत्कालीन साहाय्यक आयुक्त पवार यांनी अनधिकृत घोषित केले होते.

बांधकाम अनधिकृत घोषित करूनही माफियांनी पाच माळ्यांची इमारत सात माळ्यांची बांधून पूर्ण केली. विद्यमान साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी गोरे, भोईर यांनी बांधकाम नियमावलीचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरुद्ध एमआरटीपीचा गुन्हा विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.

हेही वाचा – कल्याण-डोंबिवली वळण रस्त्याच्या दुतर्फा वनराई बहरणार, बाराशे झाडांच्या लागवडीचे नियोजन

सुभाष रोडवर बांधकाम

डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील मारुती मंदिराजवळ अमोल श्याम कांबळे या भूमाफियाने बेकायदा इमारतीचे बांधकाम ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू केले होते. हे बांधकाम तात्काळ थांबविण्याचे आदेश तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी दिले होते. कांबळे यांनी दुर्लक्ष केले. मारुती मंदिराच्या बाजुला सात माळ्यांची वर्दळीच्या रस्त्यावर टोलेजंग इमारत उभारली. ही इमारत तोडण्यासाठी कांबळे यांना नोटिसा देऊनही ते दाद देत नसल्याने त्यांच्या विरुद्ध साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात ‘एमआरटीपी’चा गुन्हा दाखल केला. कांबळे या इमारतीत एक व्यायाम शाळा येत्या १५ दिवसांत सुरू करत आहेत. या व्यायाम शाळेला पालिकेने परवानगी कशी दिली, असे प्रश्न रहिवासी करत आहेत.

निखिलेश मोरे या भूमाफियाने कुंभारखाण पाड्यातील व्दारकामाई इमारती जवळ सात माळ्यांची बेकायदा इमारत चार वर्षांच्या कालावधीत बांधली. मोरे यांच्या विरुद्ध एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against four land mafias in dombivli illegal buildings erected in kumbharkhanpada and nawapada ssb
Show comments