कल्याण पूर्वेतील वसार गाव हद्दीतील डावलपाडा येथील पुंडलिक म्हात्रे शाळेच्या पाठीमागे बेकायदा चाळी उभारणाऱ्या चार बांधकामधारकांच्या विरुध्द कल्याण डोंबिवली पालिकेच्या आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून हिललाईन पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले.

मागील आठवड्यात साहाय्यक आयुक्त पवार यांनी माणेरे परिसरातील जीन्सचे प्रदुषणकारी बारा बेकायदा कारखाने जमीनदोस्त केले होते. वसार डावलपाडा येथील रहिवासी बाळकृष्ण फुलोरे, मंगेश फुलोरे, सुनील राणे, सचिन म्हात्रे अशी गुन्हा दाखल बांधकामधारकांची नावे आहेत. आय प्रभागाचे अधीक्षक शंकर जाधव यांनी साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या आदेशावरून हे गुन्हे दाखल केले. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाने हे गुन्हे दाखल करण्यात आले.

कल्याण पूर्वेतील वसार डावलपाडा भागातील पुंडलिक म्हात्रे शाळेच्या पाठीमागे बाळकृष्ण फुलोरे, मंगेश फुलोरे, सुनील राणे, सचिन म्हात्रे यांनी बेकायदा चाळींची बांधकामे पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता केली असल्याची माहिती आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त पवार यांना मिळाली होती. या माहितीप्रमाणे साहाय्यक आयुक्त पवार यांनी या बेकायदा चाळींची खात्री करण्यासाठी अधीक्षक जाधव, नितीन चौधरी, महेश धिंग्रे, सखाराम निरगुडा, नरेश बोंबे यांच्यासह पाहणी केली. त्यावेळी तेथे मोकळ्या जागांमध्ये चाळींची बेकायदा बांधकामे आढळून आली.

या बेकायदा चाळींची खात्री पटल्यावर साहाय्यक आयुक्त पवार यांनी चाळीची बांधकामे करणाऱ्या फुलोरे, राणे, म्हात्रे यांना नोटिसा पाठवून बांधकाम परवानगी, जमिनीचा मालकी हक्काबाबत कागदपत्रे सादर करण्याचे कळविले होते. दिलेल्या सुनावणीच्यावेळी बांधकामधारक बेकायदा चाळीच्या बांधकामांची कागदपत्रे आय प्रभागात सादर करू शकले नाहीत. त्यामुळे ही बांधकामे अनधिकृत घोषित करून त्यांना आय प्रभागाने बांधकामे स्वताहून काढून टाकण्याच नोटीस बजावली होती. त्या विहित मुदतीत बांधकामधारकांनी बेकायदा चाळींची बांधकामे काढून टाकली नाहीत.

त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त पवार, अधीक्षक जाधव यांनी बाळकृष्ण फुलोरे, मंगेश फुलोरे, सुनील राणे आणि सचिन म्हात्रे यांच्या विरुध्द हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला. या बेकायदा चाळींमधील खोल्या सुमारे पाच ते सहा लाख रूपयांना विकल्या जातात.

कल्याण पूर्वेतील आय प्रभागातील वसार डावलपाडा भागात चार जणांनी बेकायदा चाळी उभारल्याच्या तक्रारी होत्या. या चाळींच्या बांधकाम परवानगीची कागदपत्रे बांधकामधारक आय प्रभागात सादर करू शकले नाहीत. ही बांधकामे त्यांंनी स्वताहून काढून टाकली नाहीत. ही बांधकामे अनधिकृत घोषित करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. पोलीस बंदोबस्तात ही सर्व बेकायदा बांधकामे लवकरच जमीनदोस्त केली जातील. – भारत पवार, साहाय्यक आयुक्त,आय प्रभाग.

Story img Loader