डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा रस्त्यावरील पिसवली भागातून दुचाकीवरून प्रवास करत असताना जय भीमनगर ते टाटा पाॅवर भागात एका इसमानेे कल्याणमधील एका महिलेचा सोमवारी रात्री विनयभंग केला होता. या महिलेने दुसऱ्या दिवशी पिसवली भागात त्या इसमाचा शोध घेतला असता तो इसम प्रकाश वनताळे उर्फ लल्ला असल्याची खात्रीलायक माहिती पीडित महिलेला समजली. या माहितीच्या आधारे पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात लल्ला विरुध्द विनयभंगाची तक्रार केली आहे.
पीडित महिला कल्याणमधील एका भागात आपल्या कुटुंबीसह राहते. ती गृहिणी आहे. पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सोमवारी रात्री पावणे नऊच्या दरम्यान मी माझ्या दुचाकीवरून पिसवलीतील प्रवेशद्वाराच्या आतील भागातील जय भीमनगर येथून शिळफाटा रस्त्यावरील टाटा पाॅवर नाका येथे येत होती. त्यावेळी दास यांच्या दुकानासमोर एक इसम रस्त्यात उभा होता. त्या इसमाला पीडितेने दुचाकी जाण्यासाठी रस्त्यामधून बाजुला होण्याची विनंती केली.
त्यावेळी त्या इसमाने महिलेकडे रागाने पाहून ‘रस्ता तुझ्या वडिलांचा आहे का,’ असे बोलत शिवीगाळ केली. त्यावेळी आपणही रस्ता कोणाचाच नाही असे उत्तर देऊन त्याला बाजुला होण्यास सांगितले. त्याचा राग येऊन त्या इसमाने पीडितेला काही कळण्याच्या आत महिलेशी भर रस्त्यात गैरवर्तन केले. महिलेची ओढणी ओढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
हा इसम आपल्याशी आणखी काही गैरकृत्य करेल या विचाराने पीडित महिला तेथून घाईघाईने निघून गेली. दुसऱ्या दिवशी पीडित महिला आपल्या मुलाला घेऊन पिसवली भागात आली. आपल्याशी गैरवर्तन करणारा इसम कोण होता याचा शोध घेऊ लागली. त्यावेळी स्थानिकांनी महिलेला त्या इसमाचे छायाचित्र दाखवले. त्यावेळी आपल्याशी गैरवर्तन करताना तोच इसम असल्याचे महिलेने ओळखले. त्या इसमाचे नाव समजल्यावर महिलेने घरी येऊन पतीला रात्री घडलेला प्रकार सांगितला. पतीच्या सल्ल्याने महिलेने आपल्याशी गैरकृत्य करणाऱ्या प्रकाश वनताळे उर्फ लल्ला यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.