कल्याण : शिधावाटप विभागाचे बनावट सही, शिक्के तयार करून त्या माध्यमातून गरजूंना शिधावाटप कार्यालयाच्या माध्यमातून बनावट कागदपत्रांच्या आधारे शिधावाटप पत्रिका तयार करून देण्यासाठी साहाय्य करणाऱ्या कल्याण येथील वाडेघर भागातील एका शिधावाटप दुकानदारावर कल्याण गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने गुरुवारी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
शिवाजी दगडू काकड (६१) असे शिधावाटप दुकानदाराचे नाव आहे. ते कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात राहतात. शिवाजी काकड यांना कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पिसवली गाव हद्दीतील गांधीनगर मधील गुरुकृपा धान्य भंडार जवळ शिधावाटप विभागाचे बनावट सही, शिक्के आणि शिधापत्रिका तयार करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे बुधवारी कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
कल्याण गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना कल्याणमधील वाडेघर भागातील एक शिधावाटप दुकानदार शिधावाटप विभागाचे बनावट सही, शिक्के यांचा वापर करून, त्या आधारे बनावट कागदपत्रे तयार करतो. त्या आधारे गरजूंना बनावट शिधावाटप पत्रिका तयार करून देण्यासाठी साहाय्य करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले शिधावाटप दुकानदार शिवाजी काकड यांच्या हालचालींवर पाळत ठेऊन होते.
शिवाजी काकड यांनी डोंबिवली पूर्वेतील आयरे रस्ता भागात अर्जुन दर्शन इमारतीत राहणाऱ्या सुनील अशोक गुप्ता या रिक्षा चालकाचा भाऊ विजय गुप्ता यांना शिधावाटप पत्रिका तयार करण्यासाठी साहाय्यक केले असल्याची माहिती मिळाली. भोसले यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. काकड यांनी शिधावाटप विभागाचे बनावट सही, शिक्के वापरून त्या आधारे शिधापत्रिका मिळण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे शिधावाटप दुकानात दिली. त्या आधारे विजय गुप्ता यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शिधापत्रिका बनवून मिळवून दिली असल्याचे समजले.
हा बनावट कागदपत्रांचा व्यवहार करताना शिधावाटप दुकानदार शिवाजी काकड यांना शिळफाटा रस्त्यावरील पिसवली गाव हद्दीतील गुरुकृपा धान्य भांडार जवळून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शिधावाटप विभागाचे बनावट सही, शिक्के, कागदपत्रे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याबद्दल साहाय्यक उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात शिवाजी काकड यांच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक किरण भिसे याप्रकरणाचा तपास करत आहेत.
हा सगळा व्यवहार करताना शिवाजी काकड यांना आणखी कोणाची साथ होती का. काकड यांनी परप्रांतीय, घुसखोर बांग्लादेशी नागरिकांना शिधापत्रिका बनवून देण्यासाठी साहाय्यक केले आहे का, या दिशेने गु्न्हे शाखा, मानपाडा पोलीस तपास करत आहेत. आता प्रत्येक प्रकरणात शिधापत्रिका हा महत्वाचा दस्तऐवज असल्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे शिधापत्रिका तयार करून देणाऱ्यांच्या टोळ्या तयार झाल्या असल्याची चर्चा आहे. या शिधावाटप बनावट, सही शिक्के प्रकरणात आणखी काही माहिती उघड होण्याची शक्यता आहे. त्याप्रकरणाचा तपास सुरू आहे. दत्ताराम भोसले साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कल्याण गुन्हे शाखा.