ठाणे : समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांच्याविरोधात मध्यरात्री वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्याचे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगजेबाची स्तुती केल्याने हिंदू भावना दुखावणे तसेच, सत्ताधारी पक्ष मुस्लिम धर्मियांना बरबाद करत असल्याचे विधान करुन हिंदू- मुस्लिम धर्मियांमध्ये तेढ निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब याच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकारण तापले आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं हे अतिशय दुर्देवी आहे. अबू आझमी यांच्या विधानाचा निषेध करावा तेवढा कमी आहे. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. औरंगजेबाचं कौतुक करणं हे महापाप आहे”, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. त्यानंतर शिंदे गट आझमी यांच्याविरोधात आक्रमक झालेला आहे. सोमवारी रात्री उशीरा खासदार नरेश म्हस्के आणि शिंदे गटाचे पदाधिकारी ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यानंतर मध्यरात्री हा गुन्हा दाखल झाला आहे. नरेश म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमदार अबू आझमी यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी औरंगजेब याच्या राज्य कारभारावर स्तुतीसुमने उधळली. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. औरंगजेबाच्या काळात देशाला ‘सोने की चिडीया’ बोलले जात होते. असे वक्तव्य करून त्यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत असे तक्रारीत म्हटले आहे. पुढे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सत्ताधारांविषयीच्या प्रश्नावर आझमी यांनी उत्तर देताना हे लोक मुस्लिमांना बरबाद करत आहेत. या वक्तव्यामुळे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

औरंगजेबाने ४० दिवस छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले. धर्मपरिवर्तनासाठी जुलुम जबरदस्ती केली. देव धर्माची विटंबना करणाऱ्या औरंगजेबाचा कारभार भारतीय इतिहासाचा काळा अध्याय आहे. औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळून अबू आझमी यांनी हिंदूच्या भावना दुखावल्या असल्याचे तक्रारीत नमूद आहे. नरेश म्हस्के यांच्या या तक्रारीनंतर अबू आझमी यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा पुढे शून्य एफआयआरने तपासासाठी मुंबईतील पोलीस ठाण्यात पाठविला जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.