ठाणे : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम भिवंडीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रात्री ११ पर्यंत ध्वनीक्षेपक सुरू ठेवल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी आयोजकांविरोधात भारतीय पोलीस अधिनियम १३५, ३७ (१) आणि भारतीय न्यायसंहितेचे कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
भिवंडी येथे मागील काही महिन्यांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याप्रमाणे, रविवारी देखील भिवंडी येथील दिवे अंजुर भागात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. धीरेंद्र शास्त्री हे या कार्यक्रमास येणार होते. त्यामुळे हे प्रवचन ऐकण्यासाठी विविध भागातून दोन ते तीन हजार नागरिक आले होते. तसेच पोलिसांनी या भागात बंदोबस्त तैनात केला होता. नियमानुसार, रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कोणतेही वाद्य वाजविण्यास मनाई आहे. असे असतानाही रात्री ११ वाजेपर्यंत येथे कथा वाचनाचा कार्यक्रम सुरु होता. त्यासाठी ध्वनीक्षेपक बसविण्यात आले होते. नियमांबाबत लेखी सूचना देऊनही आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे आयोजकाविरोधात भारतीय पोलीस अधिनियम १३५, ३७ (१) आणि भारतीय न्यायसंहितेचे कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.