बदलापूर: बदलापुरात नवजात बालकांची खरेदी-विक्री व्यवहाराचे बिंग फुटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका २४ वर्षीय व्यक्तीला अटक केली. अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात वनविभागाचे कार्यालय आहे. येथील वनक्षेत्रात कलिंगड विक्रेता कचरा टाकत होता. त्याला रोखणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर कलिंगड विक्रेत्याने कर्मचाऱ्यांवर आरोप केले होते. त्यामुळे चित्रफितीची शहानिशा करण्यासाठी वन अधिकारी वैभव वाळिंबे यांनी संबंधित विक्रेत्याला कार्यालयात बोलावले. त्यावेळी संबंधित चित्रफीत किती जणांना प्रसारित केली याची माहिती घेण्यासाठी वाळिंबे यांनी संबंधित विक्रेत्याचा मोबाइल तपासला.
त्यावेळी त्याच्या व्हॉट्सअपमध्ये काही संशयास्पद संवाद वाचायला मिळाले. यामध्ये लहान नवजात बालकांचे काही छायाचित्र आणि त्यावर किमती लिहिण्यात आल्या होत्या. हे सर्व संशयास्पद वाटल्याने याबाबत बदलापूर पोलिसांकडे तक्रार दिली, अशी माहिती वाळिंबे यांनी दिली. या प्रकारानंतर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी गुन्हा दाखल करत बदलापूर पश्चिम येथील वालीवली येथे राहणाऱ्या तुषार साळवे (२४) याला अटक केली. त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी तुषार साळवे हा अशाच एका प्रकरणात नुकताच जामिनावर सुटून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पाच ते सात लाखांचा दर?
व्हॉट्सअॅपवरील संदेशात नवजात बालकांचे छायाचित्र आणि त्यावर दर लिहिला जात होता. पाच लाखांपासून सात लाखांपर्यंत दर बालकांच्या विक्रीसाठी मागणी केली जात होती, अशी माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली.