ठाणे महापालिका आयुक्तांचा जाहिरात फलक मालकांना इशारा

ठाणे: ठाणे शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांचे पंधरा दिवसात संरचनात्मक परिक्षण अहवाल सादर करा, अन्यथा एक वर्षाची परवानगी रद्द करण्यात येईल, असा इशारा आयुक्त अभिजीत बांगर यांनी जाहिरात फलक मालकांना दिला आहे. तसेच शहरात बेकायदा जाहिरात फलकांसाठी उभारलेले धातूचे सांगाडे काढून टाकण्याचे आदेश देत जाहिरात फलक पडून जिवीतहानी झाल्यास संबंधित मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी उद्यान सुशोभिकरणांतर्गत ठेकेदाराला जाहिरात हक्क देण्यात आल्या असून त्यातून ठेकेदाराने जाहीरात फलक उभारलेले आहेत. याशिवाय, शहरात बेकायदा जाहिरात फलकही उभारण्यात आलेले आहेत. फिरत्या जाहीरात वाहने या योजनेंतर्गत रस्त्याच्याकडेला जाहिरात वाहने उभी करण्यात आली आहेेत. ही वाहने वर्षोनुवर्षे एकाच जागेवर उभी आहेत. काही वर्षापुर्वी जाहिरात वाहनावरील फलक पडल्याची घटना ठाण्यात घडली होती. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी जाहिरात फलकांचे संरचनात्मक परिक्षण करून घेण्याच्या सुचना ठाणे महापालिका प्रशासनाकडून संबंधित मालकांना देण्यात येतात. अशाचप्रकारे यंदाही ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी येत्या जाहीरात फलकांचे संरचनात्मक परिक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >>>“ठाण्यात पोलीस संरक्षण दिलेले १०० जण कोण? सरकारी पैशाची उधळपट्टी का?” अजित पवारांचा शिंदे सरकारला सवाल

येत्या पंधरा दिवसात संरचनात्मक परिक्षण अहवाल सादर करणार नाहीत, त्यांची एक वर्षाची परवानगी रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सरचनात्मक परिक्षण अहवालानंतर जाहिरात फलक सुरक्षित नसल्याचे आढळले तर, ते फलक तात्काळ काढण्याची जबाबदारी ही संबंधित कंपनीची असेल. त्यानंतरही जर एखादी दुर्घटना घडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरातील सर्व बेकायदा जाहिरात फलकांचा शोध घेऊन त्याचे संरचनात्मक परिक्षण न करता ते तात्काळ हटविण्याची कार्यवाही करावी, असे आदेश त्यांनी परवाना तसेच अतिक्रमण विभागाला दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जाहिरात फलक पडून दुर्देवी घटना घडणार नाही याची दक्षता घेवून कार्यवाही करा. भविष्यात बेकायदा जाहिरात फलक पडून एखादी अप्रिय घटना घडल्यास संबंधित सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, याबाबत बेजबाबदारपणा चालवून घेतला नाही असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case of loss of life due to fall of advertising board a case will be registered against the owner amy
Show comments