डोंबिवली – डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील रील स्टार, विकासक सुरेंद्र पाटील यांच्या विरुध्द नाशिक भागातील एका १९ वर्षाच्या तरूणीने लैंगिक अत्याचाराची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केला आहे. पोलिसांनी तात्काळ पाटील यांच्या विरुध्द लैंगिक अत्याचार, शस्त्र प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात कोणतेही तथ्य नाही. ही तक्रार खोटी आहे, असा दावा करत गुन्हा दाखल सुरेंद्र पाटील यांनी आपण घरीच असल्याचे सांगितले. केवळ पैसे काढण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा दावा त्यांनी लोकसत्ताशी बोलताना केला. १६ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत डोंबिवली पूर्वेतील दावडी भागात हा प्रकार घडल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

सुरेंद्र पाटील आणि त्यांचा वाहन चालक या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत पीडित तरूणीने म्हटले आहे, की आपली इन्स्टाग्रामवरून सुरेंद्र पाटील यांच्याशी ओळख झाली. सुरेंद्र पाटील यांनी आपणास मुंबई विमानतळावर तुला नोकरी लावतो असे सांगून त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी आपणास बंदूक दाखवून तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन अशी धमकी दिली. आपल्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.

२९ मार्च रोजी सुरेंद्र पाटील यांनी आपणास तुझ्या बरोबरचे शरीर संबंधाचे आपली दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांत प्रसारित करीन अशी धमकी दिली. त्यावेळी पाटील यांनी आपल्या मनाविरुध्द त्यांच्या कार्यालयात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आपला विनयभंग केला. आपण शरीर संबंधासाठी विरोध करत असताना पाटील यांनी आपले केस पकडून आपणास मारहाण केली.

आपण आक्रमक प्रतिकार केल्याने आपल्यावर सोनसाखळी चोरीचा आळ पाटील यांनी घेतला. त्यानंतर त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना सुरेंद्र पाटील आणि त्यांच्या चालकाने काही गैरप्रकार आपल्या सोबत केले. याप्रकाराने आपल्या मनास लज्जा उत्पन्न झाली, अशी तक्रार पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गु्न्हा दाखल करण्यात येऊन साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती जगताप याप्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. लवकरच संबंंधिताला ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. अधिक माहितीसाठी वरिष्ठ निरीक्षक कादबाने यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

अनेक गुन्हे

मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या खुर्चीत बसून रील तयार करणे. परवानाधारी बंदुकीचा दुरूपयोग करणे. मोठ्या प्रमाणात पैसे दाखवून त्याची रील्स तयार करणे. अशा काही प्रकरणात सुरेंद्र पाटील यांच्यावर यापूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत.

काय चालले आहे ते आपणास कळत नाही. आपल्या विरुध्दची तक्रार खोटी आहे. आपण घरातच आहोत. या प्रकाराने पोलिसांनी आपणास अटक केली असती. तसे घडले नाही. फक्त आपल्याकडून पैसे काढण्यासाठी अशाप्रकारची खोटी तक्रार आपल्या विरुध्द दाखल करण्यात आली आहे. –

सुरेंद्र पाटील, ठाकुर्ली.