उल्हासनगर: उल्हासनगर न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आलेल्या एका आरोपीला चपलांच्या बॉक्समधून गांजा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. मात्र गांजा पुरवणारा अज्ञात इसम न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारून फरार झाला आहे. या घटनेनंतर आरोपींना यापूर्वीही गांजा पुरवला गेला का तसेच नेमका हा गांजा आरोपीसाठी होता की आणखी कुणासाठी असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी हर्षद सकट याला उल्हासनगर न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. सुनावणी संपल्यानंतर हर्षदला एका अज्ञात व्यक्तीने चपलांचा बॉक्स दिला. पोलिसांच्या निरीक्षणात ही घटना येताच त्यांनी तत्काळ त्या चपलेच्या बॉक्सची तपासणी केली. तपासणी दरम्यान चपलेमध्ये लपवून ठेवलेला तब्बल २५० ग्रॅम गांजा आढळून आला. गांजा सापडल्यानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या व्यक्तीने चतुराईने न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावरील सिमेंटची खिडकी तोडली आणि तेथून उडी मारून फरार झाला. या घटनेने न्यायालयात उपस्थित पोलीस अधिकारी आणि नागरिकही चक्रावले. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हर्षदला गांजा देण्याचा प्रयत्न नेमका कशासाठी करण्यात आला, याचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थ फक्त हर्षदसाठी होता की त्याच्या माध्यमातून आधारवाडी कारागृहातील इतर कैद्यांना गांजाचा पुरवठा करण्याचा डाव होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये चिंचपाडा येथे मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नागरिकांचा चोप
या घटनेनंतर उल्हासनगर न्यायालयाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंमली पदार्थांचा न्यायालयात शिरकाव होणे, आरोपीच्या मदतीसाठी बाहेरून तस्करांची उपस्थिती हे चिंतेचे विषय आहेत. न्यायालय परिसरात सुरक्षेची उपाययोजना वाढविण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. फरार झालेल्या अज्ञात इसमाला पकडण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली असून, न्यायालयाच्या सुरक्षेच्या त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या जातील. तसेच, आरोपी हर्षद सकटच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी करून अंमली पदार्थ तस्करीच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया पोलीस प्रशासनाने दिली आहे.