ठाणे : बीड येथून बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बनवून त्याआधारे पोलीस भरतीत दोघांनी आरक्षण मिळविल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ओम नगदे आणि आलम शेख यांच्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोघेही बीड जिल्ह्यातील आहेत. सुमारे वर्षभरापूर्वी असाच प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी सहा उमेदवारांविरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
ठाणे शहर पोलीस दलामध्ये २०२१ साली पोलीस शिपाई भरती जाहीर करण्यात आली. परंतू हि भरती २०२२ साली झाली. ५२१ पोलीस शिपाई पदांकरिता ही भरती प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये पोलीस शिपाई पदांकरिता प्रकल्पग्रस्त म्हणून समांतर आरक्षणाच्या २७ जागा राखीव होत्या. ५२१ जागांसाठी राज्यभरातून ३९ हजार ३३८ अर्ज आले होते. त्यापैकी १ हजार ३८४ अर्ज प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी प्राप्त झाले होते. २०२३ मध्ये मैदानी चाचण्या आणि लेखी परिक्षा झाल्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रकाशित झाली होती.
हेही वाचा…ठाण्यात हरित कचऱ्याची डोकेदुखी; रस्त्यावर जागोजागी छाटलेले वृक्ष पडून
दरम्यान निवड झालेल्या प्रकल्पग्रस्त आणि भूकंपगस्त उमेदवारांच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे आदेश पोलीस महासंचलाकांनी दिले होते. निवड झालेल्या २७ प्रकल्पग्रस्त उमेदवारांपैकी १३ उमेदवारांकडे बीड या जिल्ह्यातील प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले. यामध्ये ओम नगदे आणि आलम शेख यांचा समावेश होता. त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी पोलीस उपनिरीक्षक आनंद राठोड यांच्याकडून सुरू होती. राठोड यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेत पडताळणी केली असता, ओम आणि आलम यांच्या नावाने कोणतेही प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आल्याने ओम आणि आलम यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात शासनाच्या फसवणूकी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.