कल्याण : जवळील वैद्यकीय सेवेची पदवी, नोंदणी प्रमाणपत्र स्वताहून महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे जमा करून वैद्यकीय व्यवसाय करण्याची कोणतीही परवानगी नसताना उल्हासनगर ४ मधील पेन्सिल फॅक्टरीजवळ राम सर्जिकल नावाने दवाखाना चालवून रुग्ण सेवा करत असलेल्या डाॅ. रामदास भोईर यांच्यावर वैद्यकीय परिषदेच्या आदेशावरून उल्हासनगर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.१६) गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक डाॅ. डी. यु. वांगे यांचे आणि डाॅ. राकेश गाजरे यांचे उल्हासनगर पालिकेला चार वर्षापूर्वी उल्हासनगर शहरात वैद्यकीय पदवी जवळ नसताना रुग्ण सेवा देणाऱ्या बोगस डाॅक्टरांवर कारवाई करण्यासाठी एक पत्र प्राप्त झाले होते. या पत्राच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी उल्हासनगर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. मोहिनी धर्मा, डाॅ. विद्या चव्हाण, डाॅ. उत्कर्षा शिंदे, यश ननावरे, राजाराम केदार आणि इतर कर्मचारी असे पथक उल्हासनगर ४ मधील पेन्सिल फॅक्टरीजवळ राम सर्जिकल नावाने दवाखाना चालविणाऱ्या डाॅ. रामदास भोईर यांच्या दवाखान्यात अचानक गेले.

हेही वाचा…मोघरपाडा कारशेडची कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरु; शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून पुनर्रच्चार

पथकाने त्यांच्या दवाखान्यातील वैद्यकीय साहित्य, कागदपत्रे, वस्तुंची तपासणी केली. त्यामध्ये ॲलोपथी औषधांचा साठा पथकाला आढळून आला. ते वैद्यकीय पदवी जवळ नसताना वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले, असे पोलीस ठाण्यातील तक्रारीत उल्हासनगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. उत्कर्षा शिंदे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या पत्राप्रमाणे डाॅ. रामदास भोईर यांनी त्यांची वैद्यकीय प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र (क्र. १४३०७) स्वताहून वैद्यकीय परिषदेकडे जमा केले आहे. तरीही जवळ वैद्यकीय पदवी नसताना ते बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांची फसवणूक करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. धर्मा यांच्या आदेशावरून वैद्यकीय अधिकारी डाॅ. उत्कर्षा शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या सह वैद्यकीय व्यावसायिक अधिनियमान्वये डाॅ. रामदास भोईर यांच्यावर गुन्हा दाखल केला. डाॅ. भोईर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा…मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ‘ग्रंथयान’ बंद होण्याच्या मार्गावर; पर्यायी म्हणून घरपोच सेवा उपलब्ध

डाॅ. रामदास भोईर यांनी त्यांची वैद्यकीय प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र वैद्यकीय परिषदेकडे जमा केले आहे. तरीही ते बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांची फसवणूक करत होते. त्यामुळे त्यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ. मोहिनी धर्मा वैद्यकीय आरोग्य अधिकारी, उल्हासनगर.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered against dr ramdas bhoir in ulhasnagar for running clinic without permission sud 02