अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात प्रदुषणकारी जीन्स धुलाई कारखान्यांच्या माध्यमातून जमिनीचे प्रदुषण समोर आले असतानाच मलंगगडाच्या पायथ्याशी करवले गावात ज्वलनशील रासायनांची बेकायदेशीर पद्धतीने हाताळणी केली जात असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे.

शहरी भागात प्रदुषणकारी कामे करण्यास मज्जाव केला जात असल्याने अनेक प्रदुषणाकारी उद्योगांनी आपल्या बेकायदा उद्योगांसाठी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या काही वर्षात उल्हासनगर शहरात सुरू असलेले जीन्स धुलाई कारखाने ग्रामीण भागाकडे वळाले. कोणतीही परवानगी नसताना, कोणतेही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसताना बिनदिक्कतपणे हे कारखाने ग्रामीण भागात सुरू आहेत.

शहरी भागात जागेचा प्रश्न असल्याने आणि प्रक्रिया करण्यास टाळाटाळ करत पैसे वाचवणाऱ्या काही कंपन्या याच ग्रामीण भागात प्रक्रिया न केलेल रसायने टाकत असल्याची बाब काही वर्षांपूर्वी उघडकीस आली होती. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या वेशीवर करवले, उसाटणे या गावाजवळ कचरा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होतात करवलेजवळ ७० टन रासायनिक कचरा पिंपांमध्ये भरून जमिनीत पुरण्याचा प्रकार २०१८ वर्षात समोर आला होता. याप्रकरणी ठोस कारवाई झाली नाही.

असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा मंलगगडाच्या पायथ्याशी समोर आला आहे. खोणी तळोजा महामार्गालगत असलेल्या करवले गावच्या हद्दीत ज्वलनशील रसायनाची वाहतूक करणारा टँकर उभा करण्यात आला होता. त्या टँकरमधून रसायने विविध पिंपांमध्ये भरले जात होते. कोणत्याही परवानगीशिवाय हा प्रकार सुरू होता. याची माहिती मिळताच कल्याणच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकारावर धाड टाकत कारवाई केली. या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखेने हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गणेश संपत सोनावणे, मोनू बुधाराम प्रसाद, बंकींम उर्फ बंटी हसंध्वज महतो , राजेश सरोज ,मेहमूद खान अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आणखी सुत्रधार आणि आरोपी असण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

पुन्हा बाहेरच्या पोलिसांकडून कारवाई

काही वर्षांपूर्वी बदलापुरात एका बंद कंपनीत अंमली पदार्थाची निर्मिती केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणात हद्दीबाहेरच्या पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली होती. त्यानंतर अंबरनाथमध्ये बेकायदा कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार केले जात असल्याच्या ठिकाणीही बाहेरच्या विशेष पोलिसांनी कारवाई केली होती. आता करवले येथेही बाहेरच्या पोलिसांनी येऊन कारवाई केली आहे.