कल्याण – कल्याणमध्ये एका ४० वर्षाच्या इसमाने वेगवेगळ्या ठिकाणी आई, मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार पोलीस तपासात उघडकीला आला आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पीडित महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी चौकशी करून याप्रकरणी संबंधित इसमा विरुध्द बाल लैंगिक अत्याचार कायद्याने आणि भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुरुवारी गुन्हा दाखल करून घेतला.

याप्रकरणात इसमाला अटक करण्यात आलेली नाही. महिलेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, जानेवारीमध्ये आपली मुलगी संध्याकाळी घरी आली. त्यावेळी ती अतिशय अस्वस्थ होती. तिच्या शरीराला दुर्गंधी येत होती. त्यावेळी आपल्या अल्पवयीन मुलीला आपण तुला काय झाले आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी बालिकेने आपणास आपल्या परिचित काकाने मला आपले वडिल राहत असलेल्या घरी घेऊन गेले. तेथे आपल्याशी विविध प्रकारचे अश्लिल चाळे केले, अशी माहिती दिली. या घटनेने आपणास हादरा बसला.

मुलीशी गैरकृत्य करणारा इसम जानेवारीमध्येच रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिलेच्या घरी आला. त्याने महिलेला तुझा नवरा मयत झाला आहे. तुम्ही येथे आता राहू नका. इमारती खाली एक गाडी उभी आहे. त्यात बसा आणि निघून जा, असे बोलून बालिकेशी गैरकृ्त्य करणाऱ्या इसमाने घरात प्रवेश केला. आपण कुठेही जाणार नाही, असे महिलेने इसमाला सांगितले. महिलेची गळ्यातील ओढणी इसमाने ओढली. या इसमापासून बचाव करण्यासाठी महिला घरातील शय्यागृहात निघून गेली. त्यावेळी इसम या महिलेच्या पाठीमागे आला. त्याने धक्का मारून महिलेला बिछान्यावर पाडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची इसमाने दृश्यध्वनी चित्रफित तयार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला जोरदार प्रतिकार करून धक्का देत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी इसम महिलेला धमक्या देत शिवीगाळ करत होता.

इसम घरातून बाहेर जात नसल्याने महिलेने ओरडा करत इसमाला धक्के देत घराबाहेर काढले. घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. घडल्या प्रकाराने पीडित महिला प्रचंड अस्वस्थ होती. घरात येऊन इसमाने आपल्या बरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या बालिकेचाही इसमाने विनयभंग केला म्हणून पीडित महिलेने या दोन्ही घडलेल्या घटनांची लेखी तक्रार महात्मा फुल पोलीस ठाण्यात केली होती.

याप्रकरणाची पोलिसांची चौकशी केली. त्यात तथ्य आढळल्याने त्यानंतर याप्रकरणी महिलेच्या तक्रारी वरून इसमा विरुध्द गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल इसम कल्याण पश्चिमेतील चिखलेबागमध्ये राहतो.