कल्याण – कल्याण मधील मोहने जेतवननगर भागातील एका रिक्षा चालकाने गेल्या पंधरा दिवसापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळुन ही आत्महत्या करण्यात आली आहे, असा आरोप मृत रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत केला होता. खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून कल्याणमधील मिलिंदनगरमधील एका खासगी सावकार आणि त्याच्या साथीदार महिले विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
विजय जीवन मोरे असे गळफास घेऊन मरण पावलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. विजयच्या मृत्यूप्रकरणी त्यांचा भाऊ राजू मोरे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सावकाराकडून विजयने कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी सावकार विविध माध्यमातून आपल्या भावाला त्रास देत होता, असे तक्रारीत म्हटले होते. मृत्यूपूर्वी विजय मोरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, की ‘आपण मनाने आत्महत्या करत आहोत. आपल्या कुटुंबीयांना या आत्महत्येला जबाबदार धरू नये. आपले कुटुंब चांगले आहे. खासगी सावकाराकडून आपण कर्ज घेतले होते. तो आपणास खूप मानसिक त्रास देत होता. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली होती. आपणास सर्वांना सोडून जाताना मला खूप वाईट वाटत आहे. आपल्या दोन्ही मुलांनी शिक्षण पूर्ण करून मोठे व्हावे. मी खूप मोठा अपराध करत आहे. आपण कुटुंबीय मला माफ करा.’
पोलीस ठाण्यातील तक्रारीत राजू मोरे यांनी म्हटले आहे, की विजय यांनी सावकाराकडून आपल्या मुलांचे शालेय शुल्क भरण्यासाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज किती, कधी घेतले आहे याची माहिती विजय व्यतिरिक्त त्याच्या पत्नी किंवा इतर कोणालाही नव्हती. हे कर्ज वसुलीसाठी खासगी सावकार आणि एक महिला नेहमी रात्रीच्या वेळेत विजय मोरे यांच्या घरी येऊन त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करत कर्जाऊ रक्कमची परतफेड करण्यासाठी तगादा लावत होते. विजयने आत्महत्या करण्याच्या दोन दिवस अगोदर सावकर आणि एका महिलेने विजयच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली होती. त्यामुळे विजय या कर्जाऊ रकमेवरून तणावात होता.
पोलिसांनी या चिठ्ठीच्या माध्यमातून तपास केल्यावर पोलिसांना विजय मोरे यांनी सावकाराच्या छळामुळेच विजयने आत्महत्या केली असल्याचा निष्कर्ष काढला. विजय यांना कर्ज देणाऱ्या मिलिंदनगरमधील एक खासगी सावकार आणि त्याच्या सहकारी अनोळखी महिले विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.