कल्याण : व्हॉट्सपवर गट समुहावर एका धर्माविषयी तेढ निर्माण होईल, असा मजकूर प्रसारित करणाऱ्या पत्रकारांच्या गटसमुहा विरुध्द येथील कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून देशात काही धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा तप्त वातावरणात पुन्हा नवीन वादाची ठिणगी नको म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत.

‘पत्रकार समुदाय झिंदाबाद’ या व्हॉट्सपवर गट समुहावर एका धर्माविषयी, त्या धर्मातील रुढीपरंपरा विषयी समाजात तेढ निर्माण होईल, अशा पध्दतीने लिखाण करण्यात आले होते. हा मजकूर व्हॉट्सपवर गट समुहातून प्रसारित केला जात होता. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशिर शेख यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच, त्यांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून हा मजकूर लिहिणाऱ्या, प्रसारित करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून देशात अशांततेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसांनी सामाजिक सलोखा राहावा यासाठी यासाठी कोणाची निंदा होईल अशा प्रकारचा मजकूर व्हॉट्सपवर गट समुहावर येणार नाही याची काळजी घेण्यास सुरूवात केली आहे.

सामाजिक भान राखून प्रत्येक नागरिकाने मोबाईल, त्यामधील यंत्रणेचा, व्हॉट्सपवर वापर करावा. धार्मिक तेढ निर्माण होईल, आपल्यामुळे कोणी दुखावले जाईल असा मजकूर समाज माध्यमांमध्ये प्रसारित करू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.