बदलापूर: बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या नायट्रोजन डायॉक्साईड या वायूमुळे बदलापुरातील हजारो नागरिकांना त्रास जाणवला. याप्रकरणी बदलापूर औद्योगिक वसाहतीतील टिनको केमिकल या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीत खत , कीटकनाशक आणि रसायने तयार केली जातात.
बदलापूर पूर्वेतील औद्योगिक वसाहतीमध्ये टिनको केमिकल ही कंपनी आहे. या कंपनीत बुधवारी रात्रीच्या सुमारास रासायनिक प्रक्रिया करत असताना योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही. त्यामुळे येथून नायट्रोजन डायॉक्साईड हा वायू मोठ्या प्रमाणावर पसरला, अशी माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे. निष्काळजीपणा केल्याप्रकरणी नित्यानंद बोरा आणि प्रशांत शाहू अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बालवडकर यांनी दिली आहे. बुधवारी रात्री अचानक संपूर्ण बदलापूर शहरात नायट्रोजन डाय-ऑक्साइड पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. हवेचा गुणवत्ता निर्देशांक या काळात ३१४ पर्यंत पोहोचला होता. तर नायट्रोजन डायॉक्साईड वायूचा निर्देशांक एका तासात ३२५ पर्यंत पोहोचला होता. मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन डायॉक्साईड हवेत पसरल्याने हजारो नागरिकांना त्रास जाणवला.