लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : चार वर्षापूर्वी डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागात रस्ता बंद करण्यावरून झालेल्या वादातून भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी आम्हाला शिवीगाळ करत दमदाटी केली. म्हात्रे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सात समर्थकांनी आमच्या घरात घुसून आम्हा कुटुंबीयांना शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण केली, अशी तक्रार कुंभारखाणपाडा येथील बाळकृष्ण रामचंद्र म्हात्रे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल केली आहे.

चार वर्षापूर्वी घडलेल्या या प्रकरणाची विष्णुनगर पोलिसांनी दखल न घेतल्याने बाळकृष्ण म्हात्रे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. याप्रकरणातील सबळ पुराव्यांच्या आधारे राज्य मानवी हक्क आयोगाने विष्णुनगर पोलिसांना बाळकृष्ण म्हात्रे यांच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचे समर्थक प्रमोद चव्हाण उर्फ पम्या, अंगरक्षक नागेंद्र राय, मृत्युंजय राय, बंटी अनंता म्हात्रे, अजय निळकंठ गोलटकर, रवी माळी, अखिल निंबाळकर यांच्या विरुध्द भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

बाळकृष्ण म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, कुंभारखाणपाडा, शिवाजीनगर नाना नानी पार्कच्या बाजुला आमच्या वडिलोपार्जित जमिनीकडे मुख्य रस्त्यावरून जाणारा पोहच रस्ता कल्याण डोंबिवली पालिकेच्या ठेकेदाराने लोखंडी अडथळे उभे करून चारवर्षा पूर्वी बंद केला होता. आम्ही मे २०२१ मध्ये हेमंत म्हात्रे, मयुर म्हात्रे, शिवराम म्हात्रे गणेशघाट येथे ठेकेदाराला रस्ता का बंद केला म्हणून विचारण्यासाठी गेलो होतो. ठेकेदाराने विकास म्हात्रे यांना मोबाईलवर संपर्क करून हेमंत म्हात्रे यांच्याशी बोलणे करून दिले. विकास म्हात्रे यांनी हेमंत यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर ठेकेदाराने अंगरक्षक नागेंद्र राय यांच्या सांगण्यावरून काम सुरू केले होते.

या घटनेच्या दिवशी संध्याकाळी म्हात्रे यांचे सात समर्थक आमच्या घरी रिवॉल्व्हर, सुरे, चाकू घेऊन आले. त्यांनी विकास म्हात्रे यांच्याशी पंगा घेताय का, असे प्रश्न करून घरात दहशत निर्माण केली. मयुर म्हात्रेचा समाचार घ्यायचा आहे, असे बोलून ते निघून गेले होते. याप्रकरणी आम्ही विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलो. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही, असे बाळकृष्ण म्हात्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलीस ठाण्यातून घरी परतल्यावर पुन्हा म्हात्रे यांचे समर्थक आमच्या घराजवळ बसले होते. आम्ही पोलिसांना संपर्क केल्यावर ते निघून गेले, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणात काही तथ्य नाही. पालिकेचे गणेशघाट विकासाचे काम सुरू होते. त्याठिकाणी असलेले खांबाचे अडथळे संबंधितांनी काढून टाकले होते. पालिका, पोलिसांनी संबंधितांना समज दिली होती. विकास कामात अडथळा आणण्याचे काम संबंधितांनी केले होते. आपला याप्रकरणाशी थेट संबंध नाही. पोलिसांच्या सर्व प्रकारच्या चौकशीला आपण सामोरे जाण्यास तयार आहोत. आयोगाच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देणार आहोत. -विकास म्हात्रे, माजी नगरसेवक, डोंबिवली.