ठाणे – कळवा येथील कैलास हाईट्स या इमारतीमध्ये सदनिका खरेदी करणाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कैलास पाटील (६५)  या विकासकावर ठाणे जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. त्याच्या विरोधात महारेरा कायद्यांतर्गत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात प्रथमच असा गुन्हा दाखल झाल्याचा दावा जिल्हा महसूल विभागाने केला आहे. दरम्यान, अशाचप्रकारे  जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी महारेरा अंतर्गत तातडीने कारवाई करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा >>> ठाणे: कुख्यात गुंड रवि पुजारीचा हस्तक अटकेत; मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई, ठाणे तसेच उपनगरांमध्ये विकासकांकडून गृह खरेदीदारांची आर्थिक फसवणूक करणे, त्यांना ठरावीक वेळेत घराचा ताबा न देणे यांसारख्या घटना सातत्याने समोर येत असतात. या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी सहा वर्षांपूर्वी महारेरा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. परंतु महारेराकडूनही ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे असतानाच, आता सदनिका खरेदी करणाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा प्रशासनाने विकासकावर कारवाई केली आहे.

कळवा येथील सर्वे क्रमांक ४८/४ वर कैलास हाईट्स ही इमारत उभारण्यात आली आहे. या जागेचे मालक व विकासक कैलास छत्रपती पाटील यांनी कैलास हाईट्स मध्ये घर खरेदी केलेल्या नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी एक कोटी ५२ लाखाची थकबाकी वसूल करण्याचे आदेश मुंबईच्या महारेरा कार्यालयाने ठाणे जिल्हा प्रशासनाला दिले होते. थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी त्यांच्या इमारतीवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. इमारतीमधील सर्व सदनिका या ताब्यात घेण्यात आल्या होत्या. महसूल विभागाने त्यांचा लिलाव करून त्या लिलावापोटी एक कोटी ५३ लाख रुपये रक्कम वसुली करून त्याचे संबंधितांना वाटप करण्याचे निर्देश मुंबई महारेरा कार्यालयाने दिले होते. परंतु, वारंवार कैलास पाटील यांना संधी देऊन देखील त्यांनी महारेराच्या आदेशानुसार एक कोटी ५२ लाख रुपयाची रक्कम शासनकडे जमा केली नव्हती. याउलट त्यांनी महसूल विभागाने ताब्यात घेतलेल्या सदनिका त्यांच्या स्वतःच्या ताब्यात घेतल्या होत्या. अनेकदा ताकीद देऊनही त्यांनी रक्कम शासनास भरलेली नसल्याने आणि शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर ठाणे तहसीलदार युवराज बांगर, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी स्थानिक तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्यामार्फत कळवा पोलीस ठाण्यात कैलास पाटील यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. महारेरा कायदा २०१६ च्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील बालकाच्या हत्या प्रकरणातील मोक्काचे आरोपी निर्दोष; पोलिसांनी तपासात त्रृटी ठेवल्याचा न्यायालयाचा ठपका

महारेरा आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून संबंधित विकासकावर कळवा पोलीस ठाण्यात महारेरा कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. – युवराज बांगर, तहसीलदार, ठाणे

Story img Loader