ठाणे: घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाही काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक करत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा ३४ वाहन चलाकांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतुक पोलिसांनीच या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला.उरण येथील जेएनपीटी बंदरातून हजारो अवजड वाहने गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. तसेच हलक्या वाहनांची वाहतुक होत असते. बोरीवली, वसई किंवा मिरा भाईंदर या भागात वाहतुक करणाऱ्या राज्य परिवहन सेवा, महापालिका परिवहन सेवेच्या बसगाड्या देखील येथूनच वाहतुक करतात.
या मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडत असल्याने वाहतूक कोंडी होते. मार्गावरील गायमुख भागातील रस्ता हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या घाटातून जातो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी या मार्गावर वाहतुक बदल लागू केले आहेत. शनिवारी या भागात दुरुस्ती कामामुळे कोंडी झाली होती.
वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांकडून टप्प्याटप्प्याने वाहतुक सोडली जात होती. परंतु बेशिस्त वाहन चालकांकडून विरुद्ध दिशेने वाहतुक होत असल्याने कोंडीत भर पडली होती. अखेर पोलिसांनी या वाहन चालकांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला.
विरुद्ध दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांच्या वाहनाचे क्रमांक नोंद करुन त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. अशा ३४ वाहन चालकांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. मोटरवाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.