कल्याण – कल्याण पश्चिमेत सार्वजनिक रस्ते, पदपथांवर हातगाड्या उभ्या करून वस्तू, खाद्य पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांंवर बाजारपेठ, महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा, नागरिकांच्या जीविताला धोका होईल अशा ठिकाणी हातगाडी उभी केल्याचा ठपका ठेवत या विक्रेत्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कल्याण, डोंबिवलीतील अनेक वर्दळीचे रस्ते, चौक, पदपथांवर विक्रेते हातगाडी लावून डोसा, पाणी पुरी, भेळ विक्री, आईसक्रिम, अंडाबुर्जी, वडापाव विक्री करतात. या ठिकाणी दिवसा, रात्री ग्राहक कुटुंबीयांसह आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन येतात. त्यामुळे या हातगाड्यांच्या जागेत वाहतूक कोंडी होते. या हातगाड्यांच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेत किरकोळ कारणांवरून हाणामाऱ्या होतात. काही मद्यपी या हातगाड्यांच्या परिसरात फिरून ग्राहक, विक्रेत्यांबरोबर भांडणे करतात. ही ठिकाणे वाहन कोंडी, अनेक वेळा वादाची ठिकाणी होतात.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये रिक्षेत विसरलेला आठ लाखाचा ऐवज महिला प्रवाशाला परत

सकाळच्या वेळेत कल्याण रेल्वे स्थानक, रिक्षा वाहनतळ, बस आगारांच्या ठिकाणी विक्रेते खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावून व्यवसाय करतात. याठिकाणी गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. नागरिकांच्या जीवितास हे घातक आहे. त्यामुळेही पोलिसांनी ही आक्रमक मोहीम सुरू केली आहे. कल्याण परिमंडळाचा पदभार स्वीकारल्यापासून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण परिमंडळातील गैरधंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश स्थानिक पोलीस ठाण्यांना दिले आहेत. या आक्रमक कारवायांमुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

मुरबाड रस्त्यावरील बंधन बँकेच्या बाजुला नारळपाणी विक्रेते वाहब शेख, कल्याण स्काॅयवाॅक खाली नवीन बस स्थानकाजवळ वडापाव विक्री करणारे नरेश महाडिक, गांधी चौकातील शिवा गौडा, भेळ विक्रेते रूणाल वाळंज, आईसक्रिम विक्रेते राय पटेल, फूलचंद पटेल, पाणी पुरी विक्रेते सुनील गरव यांच्यावर महात्मा फुले पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गस्तीवरील पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व विक्रेते रस्ते, पदपथ, चौक अडवून व्यवसाय करत होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths in kalyan amy