लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन वेगवेगळ्या प्रकरणात तलाठी आणि पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. संशयित तलाठीने सात बारा संदर्भाच्या प्रलंबित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. तर पंचायत समितीचे देयक बनविण्यासाठी अभियंत्याने ठेकेदाराकडून दोन लाख २० हजार रुपये मागितल्याचे समोर आले आहे. तलाठी विरोधात ठाणेनगर तर अभियंत्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
यातील पहिले प्रकरण हे कळवा शहरातील आहे. यातील तक्रारदार यांना गृहसंकुल उभे असलेल्या जागेवरील सात बारा गृहसंकुलाच्या नावे करायचा होता. परंतु हा सात बारा गृहसंकुलाच्या नावावर करण्यासाठी संशयित तलाठी सिद्धी पातकर यांनी त्यांच्याकडून ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पथकांनी पडताळणी केली असता, तलाठी पातकर यांनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरोधात सोमवारी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तर दुसरे प्रकरण भिवंडी येथील आहे. तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी भिवंडी येथील बंदिस्त गटाराचा ठेका घेऊन काम पूर्ण केले होते. तसेच यापूर्वी देखील त्यांनी तीन कामे पूर्ण केली होती. या कामांचे आणि बंदिस्त गटाराचे देयक बनिवण्यासाठी पंचायत समितीचा शाखा अभियंता प्रमोद जुमळे याने ठेकेदाराकडून दोन लाख ४० हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर ठेकेदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली.
पथकांनी पडताळणी केली असता, जुमळे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पथकाने सोमवारी सापळा रचला. या सापळ्यात पथकाने जुमळे याला दोन लाख २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्याच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.