डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात गेल्या महिन्यात प्रसूतीसाठी दाखल एक महिलेचा मृत्यू मेसर्स एमके फॅसिलिटीस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या बाह्यस्त्रोत संस्थेच्या डाॅ. संगीता पाटील, डाॅ. मीनाश्री केंद्रे यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा ठपका पालिका उपायुक्त प्रसाद बोरकर समितीने ठेवला आहे. यासंदर्भात विष्णुनगर पोलिसांना पालिका, शासनाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी डाॅ. संगीता पाटील, डाॅ. मीनाक्षी केंद्रे या डाॅक्टरांवर शनिवारी गुन्हे दाखल केले.
विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देवरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या आदेशावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), ३(५) या कलमाने गु्न्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल डाॅक्टरांना अटक करण्यात आलेली नाही. सुवर्णा सरोदे (२६) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या डोंबिवलीतील मोठागाव भागात कुटुंबीयांसह राहत होत्या.
सुवर्णा सरोदे या गर्भवती होत्या. गेल्या महिन्यात प्रसूती कळा सुरू झाल्याने त्या पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यांची पहिली सिझेरिअन झाली असल्याने डाॅक्टरांनी त्यांच्यावर दुसऱ्यांदा सिझेरिअन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मे. एमके फॅसिलिटीस बाह्य स्त्रोत संस्थेच्या डाॅ. संगीता पाटील यांनी सुवर्णा यांच्यावर सिझेरिअन शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. गर्भाशयातून रक्तस्त्राव सुरू झाला. वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञांनी सुवर्णा यांच्यावर उपचार केले. त्यांचे गर्भाशय काढण्यात आले. उपचार सुरू असताना दोन दिवसांनी सुवर्णा यांचा शास्त्रीनगर रुग्णालयात मृत्यू झाला होता.
या मृत्यूप्रकरणी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी पालिका उपायुक्त प्रसाद बोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. कैलास पवार यांची स्वतंत्र चौकशी समिती याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमली होती. उपायुक्त प्रसाद बोरकर समितीने डाॅ. संगीता पाटील, डाॅ. मीनाक्षी केंद्रे यांच्या निष्काळजीपणामुळे सुवर्णा सरोदे यांचा मृत्यू झाल्याचा ठपका अहवालात ठेवला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांचा अहवाल येईपर्यंत डाॅ. पाटील, डाॅ. केंद्रे यांना कामावरून कमी करणे उचित होईल, अशी सूचना अहवालात केली होती.
ठाकरे गटाचे डोंबिवलीतील जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सुवर्णा सरोदे यांच्या मृत्यूला बाह्य स्त्रोत संस्थेच्या दोन डाॅक्टर जबाबदार असल्याने या संस्थेला पालिकेतून बडतर्फ करा आणि सरोदे यांना या संस्थेकडून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या आरोग्य विभागाकडे केली आहे. आमदार गोपाळराव मते, मनोज शिंदे यांनी सुवर्णा सरोदे यांच्या मृत्यूप्रकरणी विधीमंडळात प्रश्न उपस्थित करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे याप्रकरणाचा तपास करत आहेत. सुवर्णा सरोदे यांच्या मृत्यूमुळे पालिका रुग्णालयात देण्यात येत असलेल्या वैद्यकीय रुग्ण सेवांवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.