कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या ६१ शाळांमध्ये ५०२ सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
शाळांमधील वाढते गैरप्रकार विचारातून घेऊन शासनाने शासकीय, खासगी, महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे मागील वर्षी आदेश काढले होते. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता भागवत यांना दिले होते.
पालिका हद्दीतील ६१ शाळांची तातडीने पाहणी करून सीसीटीव्ही शाळांमध्ये बसविण्याचे नियोजन विद्युत विभागाने केले होते. दोन महिन्यापासून हे काम सुरू होते. हे काम आता पूर्ण झाले आहे. पालिका शाळांंमधील सीसीटीव्ही कार्यान्वित झाले आहेत. या सीसीटीव्हीचे नियंत्रण शाळेच्या मुख्याध्यापकांच्या दालनात ठेवण्यात आले आहे. मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान तीन वेळा सीसीटीव्ही चित्रण तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा : भिवंडीत हॉटेलबाहेर फेकला जातो कचरा, पालिका आयुक्तांनी घेतली हॉटेल मालक संघटनेबरोबर बैठक
या सीसीटीव्ही चित्रणात काही आक्षेपार्ह बाब आढळून आली तर ती माहिती मुख्याध्यापकांनी आपल्या वरिष्ठांना द्यावी. या समन्वयातून स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांकडे देण्यात आली आहे. सीसीटीव्हीमुळे शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांंच्यावर एका दालनातून नियंत्रण ठेवणे शाळा प्रमुखांना शक्य होणार आहे. अनेक वेळा शाळांना मे महिन्यात सुट्टी लागली की दिवसा, रात्रीच्या वेळेत शाळांमधील पंखे, खुर्च्या चोरट्यांकडून चोरीला नेण्याचे प्रकार वाढतात. सीसीटीव्हीमुळे हे प्रकार कमी होण्याची शक्यता शिक्षकांनी वर्तवली.