ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर येथील मुख्य रस्त्यावर संचार करताना दोन बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. बिबटे तीन वर्षांचा आणि एक वर्षाचा असावा असा अंदाज वन विभागाचा आहे. सतर्कतेच्या दृष्टीने वन विभाग या भागात जनजागृतीचे फलक बसविणार आहे. येऊर वन परिक्षेत्रात बिबट्यांचा अधिवास मोठ्याप्रमाणात आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रात बिबटे तसेच अनेक प्राणी, पक्षी आढळून येतात. या भागात काही आदिवासी गाव-पाडे आहेत. येथे काही व्यवसायिकांनी अतिक्रमणे करून टर्फ, हाॅटेल, ढाबे उभे केले आहेत. त्यामुळे अनेकदा या जंगलातील हाॅटेलमध्ये रात्री उशीरापर्यंत पार्ट्या सुरू असतात. प्राण्यांच्या अधिवासाला यामुळे धोका निर्माण झाला आहे. येऊरमधील बांधकामांविरोधात अनेकदा पर्यावरणवाद्यांनी आणि आदिवासींनी आंदोलने देखील केली आहेत.

येऊरमध्ये प्रवेश करण्यासाठी उपवन येथून मुख्य मार्गिका जाते. या मुख्य मार्गिलगत वायू सेनेचे तळ देखील आहे. वायु सेनेच्या तळाजवळ गुरुवारी मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास दोन बिबटे रस्त्यावरून संचार करत असल्याचे आढळून आले. ही घटना प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या चित्रीकरणात एक बिबट्या पूर्णवाढ झालेला आहे. हे बिबटे तीन वर्ष आणि एक वर्ष वयोगटातील असावेत असा अंदाज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन अधिकाऱ्यांनी व्यक्त आहे. येऊरमध्ये ठाण्यातील विविध भागातून नागरिक सकाळी चालण्यासाठी येतात. तसेच येऊर गावात प्रवेश येथील गावकऱ्यांसाठी ही मुख्य मार्गिका असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आता या भागात जनजागृतीचे फलक बसविण्यात येणार आहे. नागरिकांनी बिबट्या दिसल्यास काय करावे आणि काय करु नये याबाबतची माहिती या फलकांमध्ये असणार आहे.

२०१९ मध्येही याच भागात बिबट्याचे पिलू आढळले होते. सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना येथे बिबट्याचे पिलू आढळून आले होते. तसेच वर्तकनगर परिसरातील एका प्रसिद्ध हाॅटेलच्या वाहन तळामध्येही बिबट्या आढळून आला होता. हा बिबट्या देखील येऊरच्या जंगलातून बाहेर शहरात आला होता.

Story img Loader