आर्थिक मदतीसाठी ठाणे पोलिसांचा राज्य सरकारकडे प्रस्ताव
ठाणे, कळवा आणि मुंब्र्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमुख चौकांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे उभारण्याचे ठरले असतानाच ठाणे पोलिसांनी दुसऱ्या टप्प्यात कल्याण, डोंबिवली शहरात सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्याचा निर्णय पक्का केला आहे. पोलिसांचे संख्याबळ वाढविण्याचा आग्रह धरण्याऐवजी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिसांच्या एका कार्यक्रमात दिला होता. हे लक्षात घेऊन कल्याण, डोंबिवलीत सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या उभारणीसाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव पोलिसांनी पाठविला आहे.
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून कॅमेरे खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली. या प्रस्तावामध्ये ठाणे तसेच कल्याण या दोन्ही शहरांमध्ये सुमारे ५०० कॅमेरे बसविण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कल्याण डोंबिवली महापालिकेकडे या प्रकल्पासाठी पुरेसा निधी नाही. त्यामुळे राज्य सरकारने तो उपलब्ध करून द्यावा, असा पोलीस आयुक्तांचा प्रस्ताव आहे. जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या निधीतून कल्याण शहरात कॅमेरे बसविले जातील, असे परमबीर सिंग यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीकरिता ५०० कॅमेऱ्यांची उपलब्धता होऊ शकते, असा दावाही त्यांनी केला. या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ाचे पालक सचिव के. पी. बक्षी यांनी ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्याशी चर्चा केली असून त्यामध्ये ठाणे जिल्हा नियोजन समितीमार्फत कॅमेरे बसविण्यासाठी निधी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या निधीकरिता तातडीने जिल्हा नियोजन समितीपुढे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालक सचिव बक्षी यांनी पोलिस आयुक्त सिंग यांना केल्या आहेत. त्यानुसार, ठाणे पोलिसांनी यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली असून तो लवकरच जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात येणार आहे.
संपूर्ण शहरावर नजर
ठाणे महापालिकेतर्फे स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे वाहतूक पोलिसांना काही कॅमेरे खरेदी करून दिले आहेत. दुसऱ्या टप्प्यात वायफाययुक्त शहराच्या माध्यमातून खासगी लोकसहभागाद्वारे आणखी काही कॅमेरे सार्वजनिक ठिकाणी बसविले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांमुळे संपूर्ण शहरावर पोलिसांची नजर रहाणार आहे.