ठाणे : कुर्ला येथील बेस्टच्या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच आता ठाणे परिवहन विभागाच्या १५० टीएमटी बसगाड्यांमधील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वयित नसल्याचे समोर आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे काही सीसीटीव्ही बंद असल्याचे टीएमटी परिवहन व्यवस्थापकांनी सांगितले. यामुळे टीएमटी परिवहनाच्या बसगाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कुर्ला येथे बेस्टच्या एका बसगाडीने भरधाव वेगात अनेक वाहनांना धडक देत काही पादचाऱ्यांना उडवले होते. या दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाला असून ४९ लोक जखमी झाले. या अपघातामुळे मुंबईसह अनेक शहरे हादरल्याने आता प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच आता ठाणे परिवहन विभागाच्या १५० टीएमटी बसगाड्यांमधील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वयित नसल्याचे समोर आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे काही सीसीटीव्ही बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. बसगाड्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, मागील काही दिवसांपासून या यंत्रणांची देखभाल आणि वेळेत दुरुस्ती न झाल्यामुळे यंत्रणा कार्यरत नाहीत. सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्यामुळे चोरी, छेडछाड आणि अन्य प्रकारच्या अनुचित घटना वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वी टीएमटी बसगाडीमध्ये दुपारच्या सुमारास गर्दुल्यांनी चाकू दाखवून एका वाहकास धमकावल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होती. त्यामुळे टीएमटी प्रवासी सेवेतील कर्मचारीही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा…कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
शहरातील अनेक बस स्थानकांवर आणि बसगाड्यांमध्ये मद्यधुंद किंवा अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या गर्दुल्यांचा वावर वाढला आहे. गर्दुल्यांकडून वाहकांना चाकू दाखवून धमकावण्याचे प्रकार समोर येत आहेत. अनेक बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा नसल्यामुळे गुन्हेगारीच्या घटना नोंदवणे कठीण झाले आहे.
ठाणे परिवहन (टीएमटी) व्यवस्थेत २०१९ पासून बसगाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली होती. सुरुवातीला ५० नवीन बसगाड्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. पुढे तयार होणाऱ्या प्रत्येक नवीन बसमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाते. सध्या काही तांत्रिक बिघाडांमुळे या यंत्रणा बंद आहेत. या यंत्रणा पुन्हा कार्यरत करण्याचे काम सुरू आहे. भालचंद्र बेहरे, टीएमटी परिवहन व्यवस्थापक