कल्याण – शहरातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला येथे मस्जिद नसून मंदिरच आहे, असा निर्णय कल्याण जिल्हा न्यायालयाने मंगळवारी दिला. या निर्णयानंतर अनेक हिंदु संघटनांनी दुर्गाडी किल्ला येथे येऊन देवीची आरती आणि जल्लोष साजरा केला.
दोन समाजाशी हा प्रश्न निगडित असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंगळवारी कल्याण शहरात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पोलीस बंदोबस्त वाढविला होता. सण, उत्सव काळात किल्ल्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त नेहमीच तैनात ठेवला जातो. यावेळी प्रथमच अचानक दुर्गाडी किल्ल्याजवळ पायथ्याशी पोलिसांच बंदोबस्त वाढविण्यात आल्याने नागरिकांनी सुरुवातीला आश्चर्य व्यक्त केले. दुर्गाडी किल्ला येथे मस्जिद नव्हे तर मंदिरच असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्याचे जाहीर होताच, शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते, अनेक हिंदु संघटनानी दुर्गाडी किल्ला येथे धाव घेऊन आनंदोत्सव साजरा केला.
हेही वाचा >>> कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला
दुर्गाडी किल्ला महत्व
सातवाहन काळापासून कल्याण हे महत्वाचे बंदर ओळखले जात होते. १६५७ पर्यंत कल्याण आदिलशहाकडे होते. शिवाजी महाराजांनी कल्याण शहराचे महत्व ओळखले. आदिलशहाचा पराभव करून कल्याण स्वराजात सामील केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून दुर्गाडी किल्ल्याला विशेष महत्व आहे. दुर्गाडी खाडी किनारचे ठिकाण पाहून शिवाजी महाराजांनी हिंंदवी स्वराज्याचे पहिले आरमार कल्याणमध्ये उभारले. शिवाजी महाराजांनी कल्याणचे पहिले सुभेदार म्हणून कल्याण जवळील भादाणे गावचे आबाजी सोनदेव यांची नेमणूक केली होती. दुर्गाडी किल्ल्याची डागडुजी करून महाराजांनी उत्तर कोकणचे प्रवेशव्दार म्हणून दुर्गाडी किल्ल्याला स्थान दिले. कल्याण आरमारातून शिवाजी महाराजांनी चौल, दमण ठाण्यांवर अतिक्रमण करून पोर्तुगीजांबरोबर संघर्ष केला होता.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
दुर्गाडी किल्ला हिंदू धर्मियांच्या आस्थेचे ठिकाण आहे. न्यायालयाच्या निर्णयाने याठिकाणी मंदिरच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. न्यायालय निर्णयाची शासनाने अंमलबजावणी करावी यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रयत्न करणार आहोत. आता मलंग गड मुक्तीसाठीही असेच प्रयत्न झाले पाहिजेत. रवींद्र चव्हाण आमदार, भाजप.